‘सिध्दीविनायक’च्या महिला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर
By Admin | Updated: January 2, 2015 00:44 IST2015-01-02T00:34:45+5:302015-01-02T00:44:56+5:30
तेर : मजुरीने जाणाऱ्या ११ महिलांनी एकत्रित येत दीड वर्षापूर्वी सुरू केलेल्या ‘सिध्दीविनायक महिला बचत गटा’ने नववर्षानिमित्त साडीविक्रीचे दुकान सुरू केले आहे़

‘सिध्दीविनायक’च्या महिला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर
तेर : मजुरीने जाणाऱ्या ११ महिलांनी एकत्रित येत दीड वर्षापूर्वी सुरू केलेल्या ‘सिध्दीविनायक महिला बचत गटा’ने नववर्षानिमित्त साडीविक्रीचे दुकान सुरू केले आहे़ दीड वर्षाच्या कालावधीत एकमेकींना मदत करीत उन्नती साधलेल्या बचत गटाच्या सदस्यांनी या व्यवसायाला मोठे रूप देण्याचा ध्यास घेतला आहे़
तेर येथे उमेद अंतर्गत आजवर ३० महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे़ यातील सिध्दीविनायक महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची दीड वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली़ गावातीलच करूणा कसबे, राणी कांबळे, प्रतिभा धावारे, गंगा सोनवणे, अर्चना धावारे आदी ११ महिलांनी एकत्रित येत या गटाची स्थापना केली़ यातील बहुतांश महिला मजुरीने कामासाठी जातात़ त्यामुळे आठवड्याला येणाऱ्या मजुरीतून २५० रूपये प्रत्येकी जमा करण्यास सुरूवात केली़ या गटाने आजवर महिलांना गरजेनुसार २५ हजार रूपये कर्जाचे दोन टक्क्यांनी वाटप केले आहे़
प्रत्येक आठवड्याला गटाच्या सदस्यांची बैठक होते़ बैठकीत एकमेकींच्या अडी-अडचणीवर चर्चा करण्यात येते़ बैठकीतील चर्चेतून गरजू महिला सदस्याला आवश्यकतेनुसार मदत करण्यात येते़ एकमेकींना मदत करीत गटाला मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या महिलांनी काही महिन्यांपूर्वी एका बैठकीत साडीविक्रीचे दुकान सुरू करण्याचा मनोदय केला होता़ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती या अभियानांर्गत तेर प्रभागाचे समन्वयक डी़एम़बेरभळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा संकल्प नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पूर्णत्वास आला़ ग्रामीण बँकेने गटाला ५० हजाराचे कर्ज दिले आहे़ तर फिरते भांडवल म्हणून उमेद अंतर्गत १२ हजार २ रूपये व त्यांची बचत ४० हजार रूपये अशी रक्कम एकत्रित करून एक लाखाच्या आसपास भांडवल तयार करण्यात आले़ त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या साडीविक्री दुकानाचे सरपंच गिता कोळपे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक ए़व्ही़अर्धापुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले़ यावेळी करूणा कसबे, राणी कांबळे, प्रतिभा धावारे, गंगा सोनवणे, आर्चना धावारे यांच्यासह गटाच्या महिला सदस्या उपस्थित होत्या़ (वार्ताहर)
आमच्या गटात मजुरी करून कुटूंब चालविणाऱ्या महिला आहेत़ आम्ही आठवड्याला मजुरीतून येणाऱ्या रक्कमेतील काही रक्कम जमा करून गटाची सुरूवात केली़ काही महिलांना कर्ज देवून त्यांच्या कुटुंबासमोरील समस्याही मार्गी लावली़ हे करीत असताना साडीविक्रीचा व्यवसाय सुरू करण्याचा आम्ही संकल्प केला होता़ सर्वांच्या सहकार्यातून नववर्षाच्या पहिल्या दिवशी हा संकल्प पूर्णत्वास आला आहे़ यापुढील काळात या व्यवसायाला मोठे रूप देवून सर्वांची आर्थिक उन्नती करण्याचा आमचा मानस असल्याचे ‘सिध्दीविनायक स्वयंसहाय्यता महिला बचत गटा’च्या सचिव करूणा कसबे यांनी सांगितले़