पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा जन्मदर कमी, पण जास्त कोण जगतो; पुरुष की स्त्री?
By मुजीब देवणीकर | Updated: December 9, 2022 15:42 IST2022-12-09T15:41:37+5:302022-12-09T15:42:20+5:30
औरंगाबाद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील दहा महिन्यांत एकूण ७ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा जन्मदर कमी, पण जास्त कोण जगतो; पुरुष की स्त्री?
औरंगाबाद : पुरुषांच्या तुलनेत अलीकडे महिलांचा जन्मदर कमी झाला आहे. मात्र, पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे, ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. औरंगाबाद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील दहा महिन्यांत एकूण ७ हजार १८६ जणांचा मृत्यू झाला. त्यात ४ हजार ५६५ पुरुष, तर २ हजार ६२१ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जवळपास पन्नास टक्केच आहे. या मागची नेमकी कारणे तरी काय आहेत?
साडेचार हजार पुरुष, अडीच हजार महिलांचा मृत्यू
मागील दहा महिन्यांच्या आकडेवारीकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येते की, पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते याची वेगवेगळी कारणे असू शकतात. बदलत असलेली जीवनशैली, ताणतणाव, पुरुषांचे कष्ट आदी गोष्टींमुळे पुरुषांचे आयुष्य कमी झाले, असे म्हणता येईल.
पुरुष मृत्यूची अनेक कारणे
पुरुषांच्या मृत्यूची अनेक कारणे असतात. विविध आजार, ताणतणाव, व्यसन आदी कारणांमुळे मृत्यू जास्त असू शकतात. पुरुष आपल्या शरीराची कमी काळजी घेतात.
- डॉ. वर्षा सातपुते, निसर्गोपचार तज्ज्ञ
महिलांची सहनशक्ती जास्त
निसर्गाने पुरुषांच्या तुलनेत महिलांना ताणतणाव, काम आदी बाबींची सहनशक्ती जास्त दिली आहे. पुरुषांमध्ये ‘स्ट्रेस’ सहन करण्याची क्षमता कमी असते. खाण्या-पिण्याच्या बाबतीतही अनेकदा पुरुष दुर्लक्ष करतात. त्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळते. मधुमेह, रक्तदाब आदी आजार असले तरी योग्य उपचार घेतले पाहिजेत.
- डॉ. स्नेहा गडप्पा, स्त्री रोग तज्ज्ञ
मृत्यूची आकडेवारी काय सांगते?
महिना- पुरुष- महिला
जानेवारी- ४८९ -२७९
फेब्रुवारी- ५३९-२७२
मार्च- ४९५-२७७
एप्रिल- ३९८-२२४
मे- ४२३-२३१
जून- ३८९- २१४
जुलै- ३६७-२४१
ऑगस्ट-५०५-२८८
सप्टेंबर- ५३७- ३०७
ऑक्टोबर- ४२३-२८८
एकूण-४,५६५-२,६२१