कामावर महिला, फोटो पुरुषांचा; फुलंब्रीत पाणंद रस्त्याच्या १३ कामांत लाखोंचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:32 IST2025-07-07T13:31:34+5:302025-07-07T13:32:59+5:30
फुलंब्री तालुक्यात रोहयोच्या पाणंद, सिमेंट रस्ते कामातील घोळ चव्हाट्यावर

कामावर महिला, फोटो पुरुषांचा; फुलंब्रीत पाणंद रस्त्याच्या १३ कामांत लाखोंचा घोटाळा
- रऊफ शेख
फुलंब्री ( छत्रपती संभाजीनगर) : रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात मातोश्री पाणंद रस्त्याच्या १३ कामांत महिला मजूर कामावर असताना पुरुष मजुरांचे काम करतानाचे ग्रुप फोटो वापरून लाखो रुपयांची बिले काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
फुलंब्री तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या ‘मातोश्री पाणंद रस्ते’ योजनेच्या ३३ गावांतील ९६ कामांमध्ये मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो पुन्हा पुन्हा वापरून ५ कोटी १८ लाख रुपयांची बिले उचलण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात प्रसिद्ध केल्यानंतर आता या प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली आहे. तालुक्यात सुरू असलेल्या पाणंद रस्त्याच्या ९६ कामांपैकी १३ कामांवर महिला मजूर असताना त्या मस्टरमध्ये पुरुष मजुरांचे काम करतानाचे ग्रुप फोटो लावण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच खामगाव येथील पिराजी खरात हाऊस ते भीम वस्ती या मातोश्री पाणंद रस्त्याच्या मस्टर क्रमांक १२६७२ मध्ये जो मजुराचा फोटो अपलोड करण्यात आला आहे, तोच फोटो महालकिन्होळा या गावात सुरू असलेल्या गुऱ्हाळ वस्ती येथील कामाच्या मस्टर क्रमांक १२६८० मध्ये वापरण्यात आला आहे. धामणगाव येथील मातोश्री पाणंद रस्त्याच्या कामातील १० मस्टरमध्ये जो फोटो वापरला आहे, तोच फोटो सताळा पिंप्री येथील १० मस्टरमधील कामांसाठी अपलोड करून पैसे उचलण्यात आले आहेत.
निमखेडा येथे मातोश्री पाणंद रस्ता योजनेचे एक काम अर्धवट करण्यात आले. त्या कामाचे बिल काढण्यात येऊ नये, अशी तक्रार पंचायत समितीकडे केली असतानाही या कामाचे पूर्ण बिल उचलण्यात आले.
- नामदेव खेत्रे, सरपंच, निमखेडा
शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत; पण न केलेल्या कामांचे पाच कोटी उचलले
तालुक्यात रोहयोच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असताना फुलंब्री पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांनी या कामांची पडताळणी न करता डोळ्यावर पट्टी बांधून बिले काढली. विशेष म्हणजे रोहयो अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेत शेतकऱ्यांनी केलेल्या कामाची बिले काढण्यास निधी नसल्याचे कारण पंचायत समितीमधून देण्यात आले; परंतु मजुरांचा काम करतानाचा एकच ग्रुप फोटो ३३ गावांतील ९६ कामांमध्ये वापरून न केलेल्या कामांची तब्बल ५ कोटी १८ लाख रुपयांची बिले काढण्यासाठी अधिकाऱ्यांना निधी उपलब्ध झाल्याचे समोर आले आहे.