वूमन पॉवर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० हजार महिलांची उद्योगांत आघाडी
By विजय सरवदे | Updated: August 4, 2023 17:52 IST2023-08-04T17:51:28+5:302023-08-04T17:52:08+5:30
२०१ गावांतील बचतगटांना महिला आर्थिक विकास महामंडळाचे बूस्टर

वूमन पॉवर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० हजार महिलांची उद्योगांत आघाडी
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तब्बल २०१ गावांतील महिलांच्या बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रोत्साहन देत त्यांच्यात उद्योग व्यवसायाची ‘उमेद’ जागवली. परिणामी या गटांतील महिलांनी समूह तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या सुरू केलेल्या उत्पादनाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. यामुळे त्यांचे कुटुंबच नव्हे, तर गावांच्या प्रगतीलादेखील मोठा हातभार लागला आहे, हे विशेष!
महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) जिल्ह्यात १ हजार ९७५ महिला बचतगटांचे जाळे विणले आहे. या माध्यमातून २० हजार ३५७ महिला एकत्र आल्या असून त्यांनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत. बचत गटांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी ‘माविम’ने काही बँकांसोबत करार केला आहे. ‘माविम’च्या शिफारसीनुसार बँकांकडून सामूहिक स्तरावर उद्योग करण्यासाठी जिल्ह्यातील ७४४ गटांना २७ कोटी १३ लाख रुपयांचे सामूहिक कर्ज, तर ८४ महिलांना वैयक्तिक स्वरूपाचे प्रत्येकी १ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे.
एवढेच नाही, तर बचत गटांतील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना उद्योग- व्यवसायासाठी प्रेरित करणे, बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम या कार्यालयामार्फत केले जात असल्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
समूह स्तरावरील उद्योग कोणते
बचत गटांना समूह स्तरावर १ ते १७ लाखांपर्यंत कर्ज मिळते. या माध्यमातून महिलांनी समूह शेती, भाडेतत्त्वावर शेती, धान्य खरेदी-विक्री, भाजीपाला खरेदी-विक्री, कापडी पिशव्या बनविणे, दालमिल, मिरची पावडर, हळद पावडर, विविध मसाले, पापड तयार करणे, हॅण्डीक्राफ्ट वस्तू, दूध संकलन आणि प्रक्रिया आदी समूह स्तरावर उद्योग सुरू केले आहेत.
वैयक्तिक उद्योग कोणते
बँकांकडून १ लाखांपर्यंतचे आर्थिक साहाय्य मिळाल्यामुळे महिलांनी वैयक्तिक स्तरावर शिवणकाम, ब्युटीपार्लर, भोजनालय, स्टेशनरी, कटलरी, किराणा दुकान अशाप्रकारचे व्यवसाय सुरू केले आहेत.
उत्पादित मालाला मागणी
महिलांना उद्योग, व्यवसायासाठी प्रेरित करण्यात आल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास २०१ गावांतील महिला बचत गट सुरू झाले. अनेक बँक कर्जातून अनेक महिलांचे व्यवसाय सुरू झाले. उत्पादित मालाला शहर आणि ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. त्यामुळे महिलांची सामाजिक तसेच आर्थिक उन्नती झाली आहे.
- शीला सुर्वे-जवंजाळ, जिल्हा समन्वय अर्धकारी, (माविम)
लोकसंचलित साधन केंद्रांमार्फत बचत गट
तालुका- सीएमआरएसी- बचत गट- महिला
औरंगाबाद (शेंद्रा)- रमाई- ३००- ३१५२
गंगापूर- तेजस्विनी- ३५०- ३६०२
गंगापूर- सावित्रीबाई फुले- ३२१- ३३२०
गंगापूर- प्रगती- ३२५- ३३३९
पैठण- एकता- २२५- २२५०
सिल्लोड- प्रेरणा- २८०- २८६७
फुलंब्री- आम्रपाली- १७४- १८२७