उंडणगाव शिवारात लांडग्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:05 IST2021-02-05T04:05:56+5:302021-02-05T04:05:56+5:30
उंडणगाव : उंडणगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांनी अचानक हल्ला करून सहा मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. या हल्ल्यात ...

उंडणगाव शिवारात लांडग्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला
उंडणगाव : उंडणगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांनी अचानक हल्ला करून सहा मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. या हल्ल्यात संबंधित मेंढपाळांचे किमान चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा वनविभागाच्या वतीने करण्यात आला, तर हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्लामुळे मेंढपाळांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
उंडणगाव येथून जवळच असलेल्या भगवती वाडी शिवारात मेंढपाळ बाळा शंकर सावळे यांनी आपल्या मेंढ्या गट नंबर ६०२ या शेतात रात्रीची वाघुर लावून कोंडलेल्या होत्या. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच लांडग्यांनी या मेंढ्याच्या कळपावर अचानक हल्ला करून सहा मेंढ्यांचा फडशा पाडला, तर तीन मेंढ्या जखमी केल्या आहेत. मेंढ्याचा कळपात ओरडण्याचा आवाज येताच तिथेच झोपलेले बाळा सावळे, अनिल सपकाळ यांना जाग आली. त्यांनी एकच आवाज केला, तोपर्यंत तर त्या लांडग्यांनी सहा मेंढ्याचा फडशा पाडलेला होता. या मेंढपाळांचे किमान चाळीस हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा अजिंठा परिक्षेत्राचे एस.पी. मांगधरे, वनपाल एन.डी. काळे, वनरक्षक एस.एम. सागरे, वनमजूर शेख फकीरा यांनी केला आहे, तर या मेंढपाळांस नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील मेंढपाळ व नागरिकांनी केली आहे.