दोन दिवसांत ५० हजार प्रवेश
By Admin | Updated: July 12, 2014 00:51 IST2014-07-12T00:51:45+5:302014-07-12T00:51:45+5:30
औरंगाबाद : दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, राज्यात १ लाख २५ हजार जागांसाठी गेल्या दोन दिवसांत ५० हजार आॅन लाईन प्रवेशांची नोंदणी झालेली आहे.
दोन दिवसांत ५० हजार प्रवेश
औरंगाबाद : दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, राज्यात १ लाख २५ हजार जागांसाठी गेल्या दोन दिवसांत ५० हजार आॅन लाईन प्रवेशांची नोंदणी झालेली आहे. यापैकी ६ हजार ५०० प्रवेश निश्चित झाले आहेत.
यासंदर्भात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रवींद्र बाळापुरे यांनी सांगितले की, यंदा आॅन लाईन प्रवेशासाठी एम्प्लॉयमेंट कार्डची अट रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना आयटीआयला प्रवेश घेणे सुलभ झाले आहे. या अभ्यासक्रमासाठी आता सेमिस्टर पद्धत लागू झाली असून, आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यापुढे प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. आॅन लाईन पद्धतीने उमेदवार कोठूनही अर्ज भरू शकतात. हे अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट जवळच्या आयटीआयमध्ये नेऊन उमेदवारांनी प्रवेश निश्चिती करून घ्यावी.
२४ जुलै रोजी संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर प्रवेश फेऱ्या सुरू होतील. प्रवेश फेरीला हजर राहताना विद्यार्थ्यांनी मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवावे, असे आवाहन यावेळी डॉ. बाळापुरे यांनी केले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये अॅप्रेन्टिशिप करण्यासाठी औरंगाबादेतील आयटीआयमध्ये स्वतंत्र ‘बीटीआरआय सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे. या परिसरातील विविध कारखाने, उद्योग संस्था तसेच महावितरण कंपनीमध्ये ६ हजार ६८३ जागा उपलब्ध आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात भरती मेळावा घेऊन या जागा भरल्या जातात.
संगणक साक्षर विद्यार्थी
कोणताही ट्रेड घेऊन उत्तीर्ण झालेला विद्यार्थी हा संगणक साक्षर (आयटी लिटरसी) झाला पाहिजे तसेच कारखाने, उद्योग अथवा अन्य संस्थांमध्ये तो अॅप्रेन्टिशिप अथवा ट्रेनी म्हणून जाताना त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे, यावर ‘आयटीआय’मध्ये भर दिला जातो.
विभागातील ४९ आयटीआयचा वेगवेगळ्या कंपन्यांसोबत करार झाला आहे. यात टाटा मोटार्स, बजाज, एल अँड टी या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.
विभागात ८२ शासकीय आयटीआय
३२ अशासकीय आयटीआय
औरंगाबाद, बीड, लातूर येथे मुलींसाठी स्वतंत्र आयटीआय
अल्पसंख्याकांसाठी १२ आयटीआय
अनुसूचित जातीसाठी औरंगाबादेत स्वतंत्र आयटीआय