छत्रपती संभाजीनगरात महायुती करून विरोधकांना आयते उमेदवार देणार का?: संजय केणेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 16:50 IST2025-12-20T16:47:47+5:302025-12-20T16:50:01+5:30
‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला कोणत्या आधारावर?

छत्रपती संभाजीनगरात महायुती करून विरोधकांना आयते उमेदवार देणार का?: संजय केणेकर
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटपात ‘फिफ्टी-फिफ्टी’चा फॉर्म्युला कोणत्या आधारावर आणला जात आहे? भाजपलाच जास्त जागा मिळायला पाहिजेत, नाही तर पक्षांतील इच्छुकांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. महायुती करून विरोधकांना आयते उमेदवार मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, असे मत भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी व्यक्त केले.
जागा वाटप आणि महायुतीवरून भाजपमध्येच दुफळी निर्माण झाली आहे. कोअर कमिटीतील अनेक सदस्य युती करण्याच्या विरोधात आहेत. ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी महायुतीच्या जागा वाटपात भाजपला किमान ५० टक्के जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा गुरुवारी व्यक्त केल्यानंतर पक्षातील अनेक इच्छुकांचे अवसान गळाले आहे. त्यामुळे सावे यांच्या मागणीला आमदार केणेकर यांनीदेखील शुक्रवारी विरोध केला. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे महायुती न करण्याबाबत भावना व्यक्त केल्या. पण, माध्यमांशी बोलताना मंत्री सावे यांनी महायुतीमध्ये ५० टक्के जागा मिळाव्यात, ही भूमिका कायम असल्याचे सांगितले, तर आमदार केणेकर म्हणाले, महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ राहील. या तत्त्वावरच युती झाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पक्षांमध्ये अनेक इच्छुक व दमदार कार्यकर्ते आहेत, जे निवडणूक लढू शकतील. महायुती केल्यास त्यांना संधी मिळणार नाही. हे उमेदवार इतर पक्षात जातील. म्हणून महायुती संदर्भात कोअर कमिटीमध्ये समन्वयाने चर्चा करून निर्णय घेऊ.
भाजपला जास्त जागा मिळायला पाहिजे...
भाजपकडे प्रभागात निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत. त्यामुळे युती झाली, तर पक्षातील अनेक चांगल्या उमेदवारांचे नुकसान होईल. त्यामुळे युती करताना भाजपच्या पदरात जास्त जागा पडल्या तर ठीक, नसता विरोधी पक्षाला आयते उमेदवार मिळतील.
- संजय केणेकर, आमदार