'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप
By बापू सोळुंके | Updated: May 3, 2025 16:13 IST2025-05-03T16:12:25+5:302025-05-03T16:13:58+5:30
सामाजिक न्याय खात्याची आवश्यकताच नसेल तर खाते बंद करा आणि सगळाच निधी वळवा: संजय शिरसाट

'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप
छत्रपती संभाजीनगर: माझ्या खात्याचा निधी अन्यत्र वर्ग केल्याचे चॅनलवरील बातम्यांतून कळले, याची मला कल्पना नाही, फायनान्स डिपार्टमेंट मनमानी करते, हे चुकीचे असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. सामाजिक न्याय खात्याची आवश्यकताच नसेल तर खाते बंद करा आणि सगळाच निधी वळवा,अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मनातील खदखद व्यक्त केली.
मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले मंत्री शिरसाट यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सामाजिक न्याय खात्याचा निधी वर्ग करता येत नाही, हा कायदा आहे. फायनान्समध्ये काही महाभाग बसलेले आहेत. त्यांना असे वाटते की, हा निधी वळवता येतो, कायद्यात पळवाफळवी करुन निधी घेणे चुकीचे आहे. पैसे दलित भगिनींना दिले असे म्हणता येत नाही. मला हे पटले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्यावर अधिक बोलेल. आमच्या खात्याचे दिड हजार कोटींचे देणं आहे. हे देणे वाढत आहे. मंत्री म्हणून पत्र देणे हे माझं काम आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी पहावे. त्यांच्या निर्णयाची आणि सूचनांची आपल्याला कल्पना नसल्याचे शिरसाट म्हणाले.
गॅप भरून काढत आहोत
१०० दिवसांच्या कामाचे प्रगती पुस्तक पहिले तर मुखमंत्री यांच्या दृष्टीकोनातून अनेकांचे प्रगतिपुस्तक मायनस आहेत. आम्ही आघाडीवर पोहचू आणि मागील गॅप भरण्याचे काम करत असल्योच शिरसाट यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले.
खात्यात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
सामाजिक न्याय खात्यात जात वैधता पडताळणी समितीसाठी केवळ चार अधिकारी होते. आता यात ही २८ अधिकाऱ्यांची जात पडताळणीसाठी नियुक्ती केली आहे. सोमवारपासून हे अधिकारी रुजू होतील. याबाबतची सविस्तर माहिती वेबसाईटवर टाकली जाईल. अधिकाऱ्यांसंबंधी तक्रार असेल तर वेबसाईटवर पाठवा, तात्काळ कारवाई होइल,अशी ग्वाही त्यांनी दिली.