'छत्रपती संभाजीनगर' वरून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणार; इम्तियाज जलील यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 17:18 IST2022-07-29T17:17:29+5:302022-07-29T17:18:51+5:30
ज्या शहराचा विकास ठप्प पडला आहे. ज्या शहरात आठ-आठ दिवसाला पाणी येते. त्या शहराच्या नामकरणावरून केवळ राजकारण सुरु आहे.

'छत्रपती संभाजीनगर' वरून मुख्यमंत्री शिंदेंना काळे झेंडे दाखवणार; इम्तियाज जलील यांची घोषणा
औरंगाबाद: शहराचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील प्रेमाने किंवा आदर असल्याने झाले नसून यात केवळ राजकीय स्वार्थ आहे. प्रथम शहराच्या विकासाचा मुद्दा महत्वाचा असून नामकरणाच्या विरोधात आणि अतिवृष्टी ग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एमआयएम आणि इतर समविचारी पक्ष औरंगाबाद दौऱ्यात काळे झेंडे दाखवणार, अशी घोषणा खासदार इम्तियाज जलील यांनी आज केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर खा. इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्या शहराचा विकास ठप्प पडला आहे. ज्या शहरात आठ-आठ दिवसाला पाणी येते. त्या शहराच्या नामकरणावरून केवळ राजकारण सुरु आहे. ज्यांना काही कामधंदा नसतो ते असे काम करतात. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव अशा राजकारणासाठी वापरू नये. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज कायम महान आहेत, राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या कार्याची उंची गाठावी, असे आवाहन खा. जलील यांनी केले. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी शहर विकास आधी असे जाहीर केले होते, पण सत्ता जाणार असे दिसताच नामकरण केले. त्यानंतर शिंदे-फडणवीस यांनी हेच केले. आम्ही सुप्रीम कोर्टात हेच सांगणार आहोत. की छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेमामुळे नाव बदलेल नसून राजकीय कारण आहे, असेही जलील म्हणाले.
राज्यात दोघांचेच अद्भुत मंत्रीमंडळ
राज्यात अतिवृष्टी झाली आहे आणि राज्यात केवळ दोघांचेच अद्भुत मंत्रिमंडळ आहे. किमान कृषिमंत्री तरी नेमून अतिवृष्टीग्रस्तांना दिला द्यावा. शिंदे-फडणवीस यांना याचे काही देणेघेण नाही. यामुळेच अतिवृष्टी आणि शहर नामकरणावरून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहोत, अशी घोषणा खा. जलील यांनी केली.