एमआयडीसीचे क्षेत्र विकसित करणार - लोणीकर
By Admin | Updated: July 20, 2015 00:51 IST2015-07-20T00:29:35+5:302015-07-20T00:51:41+5:30
जालना : जिल्ह्यात अंबड, परतूर व भोकरदन या तालुक्याच्या ठिकाणी असलेले औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र विकसित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

एमआयडीसीचे क्षेत्र विकसित करणार - लोणीकर
जालना : जिल्ह्यात अंबड, परतूर व भोकरदन या तालुक्याच्या ठिकाणी असलेले औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र विकसित करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना लोणीकर म्हणाले की, खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांंसाठी २२३ कोटी रुपये व शासनाकडे थकीत असलेले ७९ कोटी प्राप्त होऊन ते त्या-त्या तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहेत़
शेतकऱ्यांना या अनुदानाचे वाटपही सुरु झाले असून जालना जिल्ह्यास पीकविम्यापोटी १९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती लोणीकर यांनी यावेळी दिली़
सन २०१५-१६ या वर्षाचा जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजनेचा २३० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोसंबी उत्पादन होत असल्याने मोसंबीवर प्रकिया करणाऱ्या प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतूदही ठेवण्यात आली असल्याचे सांगून जिल्ह्यात २१२ गावात जलयुक्त शिवार योजनेची गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे झाली असून २१२ गावातून ९८६ कामांवर २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत़
लोकसहभागातून १७ हजार घनमीटर गाळ काढण्याबरोबरच ६२ किलोमीटर नाला खोलीकरण करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़
सध्या पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ येत्या काही दिवसात अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असून त्यासाठी मुबलक प्रमाणात बी-बियाणांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला असून १ लक्ष ३१ हजार टन रासायनिक खत उपलब्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़
शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करण्यासाठी सर्व बँकांना उद्दिष्ट ठरवुन देण्यात आले असून पीकविमा वाटपात टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच दोषी अधिकाऱ्यांची सुद्घा गय केली जाणार नसल्याचेही लोणीकर म्हणाले.
जालना शहरात एका तरूणास ३०० उठबशा काढायला लावल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे किंवा माझ्याकडे कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नाही. सोशल मिडिया व वृत्तपत्राद्वारेच ही माहिती मला समजली. परंतु या प्रकरणात तक्रार प्राप्त झाली नसली तरी पोलिस प्रशासनाच्या वतीने चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. १७ वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून यासंबंधी पोलिस महानिरीक्षक विलास नांगरे पाटील हे आपल्या संपर्कात असल्याचेही लोणीकर म्हणाले.