ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:30 IST2022-03-21T13:23:25+5:302022-03-21T13:30:10+5:30
अचानक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीचे नेते, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीसोबत युतीचा प्रस्ताव दिल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली.

ज्या विचाराने तीन पक्ष एकत्र आले, त्यानुसारच एमआयएम महाविकास आघाडीत येणार
औरंगाबाद : एमआयएम (MIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी शनिवारी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) युती करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव दिला. त्यांच्या या प्रस्तावामुळे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एमआयएमच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविला. यावर रविवारी ‘लोकमत’शी बोलताना जलील यांनी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार ( Sharad Pawar) यांनी शिवसेना (Shiv Sena ) , राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ( Congress) सोबत घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. दोन वर्षांपासून सरकारचा कारभारही सुरळीत सुरू आहे. अशा परिस्थितीत शनिवारी अचानक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीचे नेते, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे महाविकास आघाडीसोबत युतीचा प्रस्ताव दिल्याचे सांगून एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कडाडून विरोध दर्शविला. महाविकास आघाडीने एमआयएमचा प्रस्ताव गुंडाळून फेकून दिला. औरंगाबादच्या स्थानिक शिवसेना नेत्यांनी तर हा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला. महाविकास आघाडीतून शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे सांगण्यात आले.
रविवारी ‘लोकमत’शी बोलताना जलील यांनी नमूद केले की, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत युती करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहोत. उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत. विविध विकासकामांच्या संदर्भात त्यांचीही भेट घेण्यात येईल. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतही चर्चा करण्यात येईल. आघाडीतील तिन्ही पक्ष किमान समान कार्यक्रमांतर्गत एकत्र आले. आम्हीसुद्धा या किमान समान कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकतो. आमचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत. त्यामुळे या विषयाला पूर्णविराम मिळाला, असेही नाही.