विद्यापीठाच्या प्रवेश क्षमतेत एकरूपता आणणार; व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यावर असेल भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 13:43 IST2021-08-26T13:41:48+5:302021-08-26T13:43:44+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University : व्यवस्थापन परिषदेतील निर्णयानुसार ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद नाही ते ११ अभ्यासक्रम बंद केले, तर ४ नवे अभ्यासक्रम सुरू केले.

विद्यापीठाच्या प्रवेश क्षमतेत एकरूपता आणणार; व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यावर असेल भर
औरंगाबाद : मोठी प्रवेश क्षमता आणि रिक्त जागांचा परिणाम नॅक तसेच एनआयआरएफ रॅंकिंग खालावण्यावर होतो. सध्या गुणवत्ता आणि रॅंकिंग वाढविण्यासोबत विद्यापीठाचा ब्रॅंडिंगवर भर आहे. त्यामुळे यूजीसीच्या नियमाप्रमाणे २०-४०-६० नुसार प्रवेश क्षमतेची एकरूपता आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी बुधवारी दिली.
डॉ. येवले म्हणाले, विभागप्रमुखांच्या वेळोवेळी घेतलेल्या बैठका, व्यवस्थापन परिषदेतील निर्णयानुसार ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद नाही ते ११ अभ्यासक्रम बंद केले, तर ४ नवे अभ्यासक्रम सुरू केले. एखाद्या व्यक्तीच्या सोयीसाठी सुरू केलेले विभाग ज्या अभ्यासक्रम, कोर्सला आता प्रतिसाद नाही असे अभ्यासक्रम बंद केले, तर काही विभाग समायोजित केले. नव्या शैक्षणिक वर्षात रोजगारपूरक व्यवसायाभिमुख वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू करत आहोत. सायबर सिक्युरिटी, रशियन, चायनीज अशा विदेशी भाषा असे काही सर्टिफिकेट कोर्सही यावर्षी सुरू करत आहोत. त्याची तयारी झाली असून, कमी वेळात करता येणारे हे सर्टिफिकेट कोर्स सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना करता येतील. त्यासाठी पात्रतेची अट नाही, अशी सुविधा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून, प्रत्यक्ष वर्ग भरण्यासंदर्भात उच्चशिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. सप्टेंबरमध्ये पदव्युत्तर पदवीची प्रवेशप्रक्रिया पूृर्ण झाल्यानंतर १ ऑक्टोबरपासून वर्ग सुरू होऊ शकतील. कोविड सेंटरसाठी दिलेली वसतिगृहे ताब्यात मिळेपर्यंत वर्ग सुरू करणे शक्य नसल्याचेही डॉ. येवले म्हणाले.