बिदरी कलाही इतिहास रूपातच उरणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 18:12 IST2019-06-12T18:10:35+5:302019-06-12T18:12:06+5:30
शहरातील मोजक्याच बिदरी कारागिरांनी उपस्थित केला सवाल

बिदरी कलाही इतिहास रूपातच उरणार का ?
- रूचिका पालोदकर
औरंगाबाद : १९६० ते ९० हा काळ औरंगाबादमधल्या बिदरी कलेसाठी अत्यंत सुगीचा काळ होता; पण काळानुसार घटलेले पर्यटन, कलाप्रेमींचा, कलेची जाण आणि कदर असणाऱ्या व्यक्तींचा अभाव आणि शासनाची या कलेबाबतची तीव्र अनास्था याचा फटका अन्य उद्योगांप्रमाणे बिदरी कलेलाही बसला. आता औरंगाबादेतील बिदरी कलाही इतिहास रूपातच जिवंत राहणार का? असा प्रश्न कलाप्रेमी आणि शहरात मोजकेच राहिलेले बिदरी कारागीर उपस्थित करत आहेत.
बिदरी कलेबाबत असे सांगितले जाते की, मोहम्मद तुघलकच्या काळात इराणहून बिदरी कलावंत भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी येथे हा व्यवसाय सुरू केला. या कलेची पाळेमुळे खऱ्या अर्थाने रूजली ती कर्नाटकातील बीदर येथे. इतिहास अभ्यासकांच्या मते बिदरी कलेचे उगमस्थान हे इराण आहे. इराणहून इराक, अजमेर आणि त्यानंतर विजापूर येथे ही कला आली आणि तेथून मग भारतात पसरत गेली, असे इतिहास अभ्यासक दुलारी कुरेशी यांनी सांगितले.
ही कला औरंगाबादला आली कशी याबाबत माहिती देताना बिदरी कारागीर युसूफ जाफरी म्हणाले की, १९६० साली आयटीआयतर्फे बिदरी कलावंतांना कर्नाटकातून औरंगाबादला बोलाविण्यात आले. येथे कलेला मिळणारा वाव आणि उत्तरोत्तर होणारी भरभराट पाहून इतर कारागीरही त्यांच्या मागोमाग येथे आले. १९७५ पर्यंत या कलेला शासनाकडून उभारी मिळाली, शेकडो कारागिरांचा उदरनिर्वाह या कलेवर होत होता; पण त्यानंतर शासनाने या कलाकारांना दिलेला आश्रय बंद केला आणि तेथूनच या व्यवसायाला उतरती कळा लागली.
बिदरी कला हा युसूफ जाफरी यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. सध्या ते महात्मा गांधी मिशन येथे या कलेची निर्मिती करत असून, कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, आज ही कला जाणणारे लोक कमी झाले असून, नव्या पिढीला तर याबाबतीत पूर्णच अनास्था आहे. पूर्वी परदेशातून या वस्तूंची मोठी मागणी असायची; पण आता स्थानिक लोकही या वस्तू फार घेत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सरकार दरबारी अनास्था : बिदरी कलेला उभारणी देण्यासाठी बिदरी क्लस्टर तयार करण्याची घोषणा २०१३ मध्ये करण्यात आली होती; पण अजूनही बिदरी क्लस्टर उभे राहिलेले नाही. पूर्वी हस्तकलेच्या कलाकारांना शासनाकडून ओळखपत्र मिळायचे. यातून त्यांना अनेक सुविधा तसेच विविध प्रदर्शनांना जाण्यासाठी कलावंतांना प्रवासी भत्ता, राहण्याची व्यवस्था या सोयी मिळायच्या. पण १९९० पासून या सोयीसुविधा बंद झाल्या. कर्नाटक सरकारने बिदरी कारागिरांसाठी खूप सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशा कोणत्याच योजना राज्यात राबविण्यात येत नसल्यामुळेही औरंगाबादेत या कलेचा इतिहासच उरतो की काय, अशी भीती कारागिरांनी व्यक्त केली.
कर्नाटकी मातीतच भाजतात कलाकृती
अत्यंत नाजूक आणि मेहनतीने केलेले सुबक काम हे या कलेचे वैशिष्ट्य. बिदरी कलेमध्ये ९० टक्के झिंक आणि १० टक्के कॉपर असे प्रमाण असलेल्या विविध आकारांवर सोने-चांदी वापरून कलाकुसर केली जाते. १०० रुपयांपासून ते अगदी १ लाखापर्यंतच्या किमतीत या वस्तू मिळतात. कलाकुसर झाल्यावर तयार केलेली वस्तू कर्नाटक येथे मिळणाऱ्या मातीच्या भट्टीत तापवली जाते. दागदागिने, पेपर वेट, कफलिंग, फ्लॉवर पॉट, पेपर कटर, मेणबत्ती ठेवण्याचे स्टॅण्ड, लेटर बॉक्स आणि अनेक शोभेच्या वस्तू या कलेअंतर्गत बनविण्यात येतात.