पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
By Admin | Updated: December 30, 2014 01:16 IST2014-12-30T01:13:14+5:302014-12-30T01:16:26+5:30
उमरगा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने येथील न्यायालयाने पतीस जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

पत्नीचा खून; पतीस जन्मठेप
उमरगा : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा साडीने गळा आवळून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने येथील न्यायालयाने पतीस जन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत सहाय्यक सरकारी वकील व्ही. एस. आळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोहारा तालुक्यातील हिप्परगा (राव) येथील नागनाथ दत्तू शिवकर यांची मुलगी मनीषा हिचे लग्न गावातील अविनाश महादेव जाधव याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर एक वर्ष त्यांचा संसार चांगला चालला. मात्र त्यानंतर अविनाश हा पत्नी मनीषा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करू लागला. याबाबत मनिषाने वडिलांना सांगितल्यानंतर नागनाथ शिवकर यांनी अविनाश यास पुणे येथे बोलावून घेऊन मुलीस त्रास न देण्याबाबत समजून सांगितले होते. परंतु, त्यानंतरही हा त्रास सुरूच होता. १६ जानेवारी २०१३ रोजी नागनाथ शिवकर हे पुण्यात असताना अविनाश याचा भाऊ महेश जाधव याने अविनाश व मनिषा या दोघांनी हिप्परगा गावी विष प्राषण केले असून, त्यांना लोहारा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचे फोनवरून सांगितले. यावरून नागनाथ व त्यांच्या पत्नी हे दोघे ग्रामीण रूग्णालयात गेले. परंतु, तोपर्यंत मनिषा ही मयत झाली होती.
यानंतर नागनाथ शिवकर यांनी मनिषा हिच्या मृत्यूस तिचा नवरा अविनाश हाच कारणीभूत असल्याची फिर्याद लोहारा पोलिस ठाण्यात दिली. यावरून गुन्हा नोंद झाला.दरम्यान, लोहारा ग्रामीण रूग्णालयात मनिषाचे शवविच्छेदन केल्यानंतर या अहवालात मनिषाचा मृत्यू हा विषारी द्रव पिल्याने नव्हे तर साडीने गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून लोहारा पोलिसांनी अविनाश याच्याविरूध्द भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला.
या प्रकरणात न्यायालयासमोर आलेल्या साक्षी, पुरावे व सहाय्यक सरकारी अभियोक्ता आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. मुगले यांनी अविनाश जाधव यास जन्मठेप व दहा हजार रूपये दंड. दंड न दिल्यास एक वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. (वार्ताहर)
या प्रकरणात सुनावणीच्या वेळी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी नागनाथ दत्तू शिवकर, डॉ. ए. एस. गिराम व लहान मुलगा अजय खंडू शिवकर (वय ११) यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सदरील प्रकरणात प्रत्यक्षदर्शी एकही साक्षीदार नव्हता. आरोपीने स्वत: विष न पिल्याचा अभिप्राय उपसंचालक न्यायवैद्यकीय शास्त्र, औरंगाबाद यांनी दिला होता. आरोपीने स्वत:च्या घरी पत्नीचा साडीने गळा आवळून केलेला खून व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष तसेच परिस्थितीजन्य पुरावा. याशिवाय अविनाश याने स्वत: व पत्नीने विष घेतल्याचे केलेले नाटक, नंतर मनिषाच्या मृत्यूबद्दल तिने स्वत: फाशी घेतल्यामुळे व तो स्वत: बेशुध्द पडल्याचे केलेले नाटक शिक्षा देण्यास पूरक आहेत, असा युक्तीवाद व्ही. एस. आळंगे यांनी केला.