corona virus एवढे मृत्यू का ?; कारणे शोधण्यासाठी केंद्रीय पथक पुन्हा धडकले घाटी रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 15:31 IST2021-04-12T15:28:30+5:302021-04-12T15:31:20+5:30
Death Audit Of Corona Patients in Aurangabad घाटीत डेथ ऑडिट कमिटीची बैठक कधी होते, त्यांची निरीक्षणे काय आहेत, याविषयी सविस्तर आढावा पथकाने घेतला.

corona virus एवढे मृत्यू का ?; कारणे शोधण्यासाठी केंद्रीय पथक पुन्हा धडकले घाटी रुग्णालयात
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या पथकाने शनिवारी घाटी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. परंतु, रात्री उशिरा या पथकाला दिल्लीवरून फोन आला आणि ‘एका दिवसात एवढे मृत्यू का होत आहेत?’, ‘परत घाटीत जा, मृत्यूची कारणे शोधा’ अशी सूचना करण्यात आली. त्यामुळे रविवारी सकाळीच हे पथक पुन्हा घाटीत धडकले व त्यांनी घाटीतील डेथ ऑडिट कमिटीकडून रुग्णांच्या मृत्यूच्या परिस्थितीविषयी सविस्तर आढावा घेतला.
या अनुषंगाने घाटीत पार पडलेल्या बैठकीला डेथ ऑडिट कमिटीचे डाॅ. अनिल जोशी, डाॅ. एल. एस. देशमुख, मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य, डाॅ. प्रभाकर जिरवणकर, डाॅ. कैलास चिंतळे, डाॅ. अविनाश लांब, डाॅ. प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते. घाटीत डेथ ऑडिट कमिटीची बैठक कधी होते, त्यांची निरीक्षणे काय आहेत, याविषयी सविस्तर आढावा पथकाने घेतला. घाटीत दर आठवड्याला ही बैठक घेतली जाते. घाटीतील १२५८ रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांच्या विश्लेषणातील काही बाबी पथकासमोर मांडण्यात आल्या. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब असे आजार असणाऱ्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण हे अधिक आहे. ही परिस्थिती सर्वत्रच असल्याचे पथकाने म्हटले.
घाटीत मराठवाड्यासह लगतच्या भागातून रुग्ण दाखल होतात, ही बाब समोर आल्यानंतर पथकाने, घाटीत रुग्णांना नाकारण्यात येत नाही का, असा प्रश्न केला. तेव्हा कोरोना रुग्णांनाच नव्हे, इतर कोणत्याही रुग्णाला नाकारले जात नाही. जशी होईल, तशी व्यवस्था केली जाते, असे घाटीकडून सांगण्यात आले.
अभ्यास करून अहवाल
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी वयाच्या रुग्णांचा बळी जात आहे. संसर्ग झाल्यानंतर ३ ते ४ दिवसातच बरेचशे मृत्यू झाले. न्युमोनियाचे प्रमाण लवकर वाढत असल्याचे निरीक्षक पथकासमोर ठेवण्यात आले. घाटीने पथकाकडून सूचनांची विचारणा केली. परंतु या सगळ्यासंदर्भात अभ्यास करून अहवाल दिला जाईल, असे सांगण्यात आले.
रुग्णांच्या मृत्यूची काही कारणे...
- कोरोनासह अन्य गंभीर आजार
- अधिक वयोमान
- ८० टक्के रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९० च्या खाली
- गंभीर अवस्थेत रुग्ण रेफर होण्याचे प्रमाण अधिक
- रुग्णालयात उशिरा दाखल होणे