शेत का विकायचं? कृषी पर्यटन केंद्र थाटून लाखोंत कमावायचं ! काय आहे योजना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 20:00 IST2025-10-14T20:00:04+5:302025-10-14T20:00:18+5:30
कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या सुमारे ३० टक्के अनुदान शासनाकडून मिळते.

शेत का विकायचं? कृषी पर्यटन केंद्र थाटून लाखोंत कमावायचं ! काय आहे योजना?
छत्रपती संभाजीनगर : शेतात पर्यटकांना आकर्षित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन देणारी कृषी पर्यटन केंद्र योजना पर्यटन विभागाने आणली आहे. त्याअंतर्गत राज्य सरकारने कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी, मार्गदर्शन आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणे तयार केली आहेत.
काय आहे कृषी पर्यटन केंद्र?
कृषी पर्यटन योजनेंतर्गत शेतीशी संबंधित व्यवसायांना पर्यटनाशी जोडणारी जागा होय. तेथे पर्यटकांना शेतीशी निगडीत काम, ग्रामीण आणि निसर्ग जीवनाचा आनंद घेता येतो. यातून पर्यटकांना आनंद आणि शेतकऱ्यांना पैसे मिळतात.
पर्यटक तुमची शेती कसणार!
शेतीची आवड असलेले शहरी व्यक्ती कृषी पर्यटनाला पसंती देतात. हे पर्यटक हे त्यांच्या आवडीनुसार शेतात काम करतात. शेती मशागतीपासून ते लागवड, उत्पादन, माल पॅकिंग आदी कामे ते आवडीनुसार करतात.
केंद्रांसाठी शासनाचे कोणते लाभ मिळतात?
राज्य सरकारकडे नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी शासनाकडून ३० टक्के अनुदान देण्यात येते. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग आणि सहकारी बँकांकडून १० टक्के व्याजाने कर्जही उपलब्ध हाेते.
नोंदणी कुठे अन् कशी करायची?
कृषी पर्यटन केंद्रासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. सोबत अर्जदाराच्या शेतीचा सातबारा, वीज बील, नोंदणी शुल्क भरून, अन्य आवश्यक परवाने सादर करावे लागते.
निकष आणि कागदपत्रे कोणती?
कृषी पर्यटन केंद्राच्या नोंदणीसाठी किमान १ एकर शेती असावी. नोंदणीसाठी अर्जदाराकडे सातबारा, आधारकार्ड, पॅनकार्ड, वीज बिल आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.
अनुदान, कर्ज आणि इतर सुविधा
कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या सुमारे ३० टक्के अनुदान शासनाकडून मिळते. तसेच, विविध बँकांकडून यासाठी अत्यल्प दराने कर्जही उपलब्ध करण्यात येते.