शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद हवी कशासाठी?

By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:58+5:302020-12-05T04:07:58+5:30

इतर पर्यायांचा व्हावा विचार : विद्यार्थ्यांना ठेवावे जातीपासून दूर, तज्ज्ञांचा सूर औरंगाबाद : शाळेच्या दाखल्यावर, पटावर जातीचा उल्लेख शालेय ...

Why do you need caste record on school certificate? | शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद हवी कशासाठी?

शाळेच्या दाखल्यावर जातीची नोंद हवी कशासाठी?

इतर पर्यायांचा व्हावा विचार : विद्यार्थ्यांना ठेवावे जातीपासून दूर, तज्ज्ञांचा सूर

औरंगाबाद : शाळेच्या दाखल्यावर, पटावर जातीचा उल्लेख शालेय जीवनातच लहानग्यांच्या मनात जातीची भावना पेरण्यास मदत करते. जातीची नोंद ठेवायचीच असेल, तर त्यासाठी इतर अनेक पर्याय आहेत. त्यामुळे शाळेच्या दाखल्यावरील जात हटवली जावी. केवळ कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातून जात हटावी, असा सूर सर्वच स्तरांतून निघत आहे.

बालवयातच जाती-पातीची, प्रवर्गाची भावना शाळेतील प्रवर्ग आणि जातीच्या उल्लेखाने रुजवण्यात भर पडते, ती योग्य नाही, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. शाळेच्या टीसीवर जात असली तरी जात प्रमाणपत्र, पडताळणी प्रमाणपत्र लागतेच. त्यासाठी निर्गम उतारा लागतोच. मग, शाळेच्या दाखल्यावर जात नसली, तरी काही अडचण येणार नाही. मात्र, जात असल्याने जातभावना वाढीस खतपाणी मिळते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने प्रवर्ग बनवले गेले. प्रवर्गावर घटनात्मक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, नोकरीविषयक न्यायाची जी प्रक्रिया सुरू आहे, ती अधिक न्यायसंगत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन पुढे चालवली गेली पाहिजे. मात्र, जात या मुद्याचा वापर प्रस्थापित राजकीय व्यवस्था करते. समतेच्या लढाईला खो देण्याच्या षड्‌यंत्राचा तो भाग आहे. देशाला जात निर्मूनालाची गरज आहे. मात्र, ही चर्चा केवळ कागदोपत्री सुरू आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी व्यक्त केले.

---

लहान मुलांवर शाळेत जातपात बिंबवू नये

शाळेच्या दाखल्यावरून जात हटवायला पाहिजे. प्रवेश निर्गम उताऱ्यावर नोंद ठेवता येईल किंवा जातीच्या प्रमाणपत्रासाठी विशेष अभियान घ्यावे. केवळ शाळेच्या दाखल्यावर जात असली तरी जात प्रमाणपत्र आणि पडताळणी प्रमाणपत्र लागतेच. शाळेच्या दाखल्यावर किंवा शाळेत जात कळल्याने जातीची, प्रवर्गाची ओळख लहान मुलांवर शालेय जीवनात बिंबत जाते.

-एस.पी. जवळकर, शिक्षणतज्ज्ञ

---

कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातूनही जात हटावी

जात सर्वच ठिकाणांहून हटली पाहिजे. भारतातून कागदोपत्रीच नव्हे, तर वास्तविक जीवनातील जात हटण्याची नितांत गरज आहे. देशात वर्ण जातीव्यवस्थेचा तुरुंग आहे. हा तुरुंग उद्‌ध्वस्त झाला पाहिजे. आधुनिक भारताची भूमिका तशीच असली पाहिजे. त्यासाठी कागदोपत्री जातीपातीच्या नोंदी नष्ट केल्या पाहिजेत. वास्तवात राज्य यंत्रणेने त्यासाठी अग्रक्रमाने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, रोजगारविषयक धोरणे निर्माण करून प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचवावी.

-ॲड. विष्णू ढोबळे, अध्यक्ष, समाजवादी जनपरिषद, महाराष्ट्र

---

जातीव्यवस्थेचे विसर्जन व्हावे

शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असू नये. खरे पाहिले तर जातीव्यवस्थेचे विसर्जन झाले पाहिजे. जातीभेदाच्या विषाचा परिणाम कमी करायचा असेल, तर शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातूनच ते होऊ शकेल. दाखल्यावर व पटावर जातीचा उल्लेख टाळून त्याची सुरुवात होऊ शकते. सध्याच्या व्यवस्थेत जिथे अनिवार्य आहे तिथे जात प्रमाणपत्र वापरता येईल. दाखल्यावर जात येणे अनावश्यक आहे.

-डाॅ. श्रीरंग देशपांडे, शिक्षणतज्ज्ञ

---

दृष्टिकोन बदलत असल्याचे जाणवते

जातीचा उल्लेख शाळेच्या दाखल्यावर किंवा शाळेच्या नेहमीच्या कामात येण्यामुळे मुलांमध्ये जातीसंबंधीच्या भाव भावना निर्माण होतात. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे अनेकदा जाणवते. त्यासाठी निर्गम उताऱ्यावर नोंदी, स्वतंत्र प्रमाणपत्र, असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे टीसीवरचा जातीचा उल्लेख हटवायला हवा.

-शकिला न्हावकर, प्रभारी मुख्याध्यापक

--

आपला, परका भेद अनुभवायला येतात

शाळेचा दाखला जात कळण्याचे मुख्य माध्यम ठरते. जात कळाल्यावर जातीय मानसिकतेचे लोक त्याच भावनेने वागायला लागतात. सर्वच तसेच नसतात. मात्र, आपला व परका, हे भेद अनुभवायला येतात. हे बदल जात कळाल्यावर, वागणे बदल्यावर जाणवते. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या कागदपत्रांतून दिसणारी जात हटवली जावी.

-योगेश बहादुरे, संशोधक विद्यार्थी

Web Title: Why do you need caste record on school certificate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.