'माझ्या बहिणीवर प्रेम का करतोस' म्हणत टोळक्याचा हल्ला, तरुणास चाकूने भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 17:30 IST2022-01-10T17:28:56+5:302022-01-10T17:30:57+5:30
शुभमची स्थिती गंभीर असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने दिली.

'माझ्या बहिणीवर प्रेम का करतोस' म्हणत टोळक्याचा हल्ला, तरुणास चाकूने भोसकले
औरंगाबाद: 'माझ्या बहिणीवर प्रेम का करतोस', असे म्हणत आठ जणांच्या टोळक्याने एका युवकास मारहाण करीत भोसकल्याची घटना शनिवारी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात घडली.
क्रांती चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओळखीतील तरुणांनी शुभम दिलीप बागूल (वय २५, रा. बालाजीनगर) यास बोलावून घेतले. शुभम आल्यानंतर त्याला आरोपींपैकी एकाने माझ्या बहिणीवर प्रेम का करतोस, तुझा मोबाइल दे, असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर शुभम यास सहा जणांनी मारहाण करीत चाकूने भोसकले. नंतर मारहाण करणारे पसार झाले. शुभमला मित्राच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हरीश उर्फ अण्णा, रितेश उर्फ दादा यांच्यासह अनोळखी सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुभमची स्थिती गंभीर असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने दिली.
लग्नासाठी तरुणीसह कुटुंबीयांना शिवीगाळ
दुसऱ्या एका घटनेत विवाहासाठी परिचित युवतीवर दबाव आणून तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मित्र-मैत्रीण असल्यामुळे लग्न करण्याची मागणी या तरुणाने तरुणीकडे केली. वारंवार फोन करून तो लग्नासाठी दबाव टाकत होता. त्याने मुलीचे वडील, काका यांनाही फोनवरून शिवीगाळ केली. लग्न लावून न दिल्यास तरुणीसोबत असलेले छायाचित्र नातेवाइकांमध्ये व्हायरल करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तरुणीने एमआयडीसी सिडको पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी साबान मुजीब खान (वय २३, रा. नालासोपारा, वाकनपाडा, मुंबई) याच्या विरोधात विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक अबुल करीत आहेत.