‘वडिलांना दारू का देता ?’ जाब विचारत अवैध विक्रेत्याचा केला खून; आरोपीला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 20:03 IST2025-09-19T20:03:35+5:302025-09-19T20:03:59+5:30
दंडाची रक्कम मयताच्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचाही आदेश

‘वडिलांना दारू का देता ?’ जाब विचारत अवैध विक्रेत्याचा केला खून; आरोपीला जन्मठेप
छत्रपती संभाजीनगर : ‘वडिलांना दारू का देता ?’ असा जाब विचारून, अवैधरीत्या देशी दारू विक्रीचा व्यवसाय करणारा बबन देवमन कुचे याच्यावर चाकूने वार करून खून करणारा करण नामदेव बनकर (दोघेही रा. राजाराय टाकळी ता. खुलताबाद) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी दि.१८ सप्टेंबर रोजी जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड ठोठावला.
दंडाची रकम मयताच्या पत्नीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडितेला योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
काय होती घटना?
मयत बबन यांची पत्नी दीपाली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शेतकरी आहेत. शेतीचे उत्पन्न अपुरे असल्याने त्यांनी बेकायदेशीर देशी दारूविक्री सुरू केली होती. गावातील नामदेव बनकरसह अनेकजण त्यांच्या घरी दारू घेण्यासाठी येत होते. १० मे २०२३ रोजी सायंकाळी दारू प्याल्यानंतर नामदेव बनकरने घरी जाऊन पत्नी व मुलांना शिवीगाळ करून भाजीत पाणी टाकले. यामुळे त्याचा मुलगा करण संतापला. त्याने घरातील कुऱ्हाडीने बबन कुचेंवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बबनने कुऱ्हाड हिसकावून घेतली. करणने दगडफेक करून धमक्या दिल्या व निघून गेला. काही वेळाने करण व त्याचा अल्पवयीन भाऊ पुन्हा बबनच्या घरी गेले. तुम्ही आमच्या वडिलांना दारू का देता? असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. करणने पाठीमागून बबनच्या पाठीवर धारदार चाकूने वार करून खून केला. याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याची सुनावणी व शिक्षा
तत्कालीन पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बी. आर. लोया यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यापैकी फिर्यादी दीपाली कुचे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सुनावणीअंती न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.