अटकेनंतर पोलिसांनी फोन का केला नाही? मृत्यूनंतर नंबर मिळाला का? सोमनाथ यांच्या आईचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 20:05 IST2024-12-17T20:02:42+5:302024-12-17T20:05:38+5:30
आधी कळविले असते, तर आज माझं लेकरू जिवंत असतं.: मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी आणि नातेवाइकांना घाटी परिसरात भावना अनावर झाल्या; शवविच्छेदनगृहासमोर बसून राहिले मयत सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय.

अटकेनंतर पोलिसांनी फोन का केला नाही? मृत्यूनंतर नंबर मिळाला का? सोमनाथ यांच्या आईचा सवाल
छत्रपती संभाजीनगर : सोमनाथला अटक केल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांना फोन का केला नाही. अटक केल्याची माहिती नातेवाइकांना देणे, हे पोलिसांचे कर्तव्य होते; परंतु त्यांनी कळविले नाही. थेट मृत्यू झाल्याचे कळविले. तेव्हा आमचे नंबर कसे सापडले, असा सवाल मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी उपस्थित केला.
घाटीत रविवारी रात्री सोमनाथचे पार्थिव शवविच्छेदनासाठी दाखल झाले. मात्र, नातेवाइकांअभावी शवविच्छेदन रात्री झाले नाही. साेमनाथ यांची आई आणि नातेवाईक सोमवारी पहाटे घाटीत आले. त्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली. शवविच्छेदन सुरू असताना विजयाबाई आणि कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. रोज फोनवर ‘आई तू कशी आहेस, आई तू जेवलीस का’ असे विचारणा करणारे लेकरू कायमचे गप्प झाल्याचे म्हणत विजयाबाई यांना अश्रू अनावर झाले. हे दृश्य पाहून उपस्थित हळहळले.
सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी उपस्थित केलेले प्रश्न
- सोमनाथ हा विधिचे (लाॅ) शिक्षण घेत होता. एक शिक्षित विद्यार्थी दगडफेक करू शकतो का?
- सोमनाथला अटक केल्यानंतर त्याच्याकडील फोन काढून घेतले. अटकेची माहिती कळविणे हे पोलिसांचे कर्तव्य होते. पण का कळविले नाही?
- सोमनाथला का मारहाण करण्यात आली?
- मृत्यू झाल्यानंतर मृतदेह परभणीला की, छत्रपती संभाजीनगरला आहे, याची वेळीच योग्य माहिती का देण्यात आली नाही?
अटक केल्यानंतर संपर्क नाही, थेट मृत्यूनंतर फोन
सोमनाथला अटक केल्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला नाही. मात्र, मृत्यूनंतर फोन केला. पोलिसांनी आधीच संपर्क साधला असता तर माझे लेकरू जिवंत राहिले असते, असे विजयाबाई म्हणाल्या.
दोषींवर कारवाईची मागणी
सोमनाथला मारहाण करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. सोमनाथला मारहाण का करण्यात आली, याची चौकशी करावी, अशी मागणी विजयाबाईंनी केली.
घाटीत जोरदार घोषणा
सकाळी साडेअकरा वाजता शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव रुग्णवाहिकेने परभणीकडे रवाना झाले. रुग्णवाहिकेसोबत मोठा पोलिस बंदोबस्त होता. घाटीत शवविच्छेदनगृह परिसरात आंबेडकरी चळवळीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह युवकांनी मोठी गर्दी केली. यावेळी ‘सोमनाथ अमर रहे’ अशा घोषणांसह पोलिसांच्या विरोधातील घोषणाही देण्यात देण्यात आल्या.