नांदेड : जुन्या नांदेड भागात गुरुवारी सायंकाळी गोळीबाराचा थरार घडला असून, त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेतील मयत व आरोपी दोघेही कुख्यात गुन्हेगार असून, पूर्वाश्रमीचे मित्र होते. प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. दरम्यान, साथीदारांच्या मदतीने आरोपीचा गेम करायला गेला असता हा प्रकार त्याच्यावरच उलटला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सक्षम गौतम ताटे (वय २५, रा. संघर्षनगर, नांदेड), असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.जुनागंज भागातील पैलवान टी हाउसच्या मागील बाजूस मिलिंदनगर येथे २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सक्षम ताटे अन्य मित्रांसह थांबला होता. यावेळी त्याचा वाद हिमेश मामीडवार याच्यासोबत झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. हिमेश व त्याच्यासोबत असलेल्या एकाने जवळील बंदुकीतून सक्षम याच्यावर गोळी झाडली, ती त्याच्या छातीत लागल्यावर जवळच पडलेल्या फरशीने डोक्यावर वार करण्यात आले. या दुहेरी हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन सक्षम जागीच गतप्राण झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इतवारा विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे गतिमान केली. नाकाबंदी करत अवघ्या तासाभरात हिमेश मामीडवार व गजानन मामीडवार या दोघांना ताब्यात घेतले.सक्षम ताटे आणि हिमेश मामीडवार हे कधीकाळचे जिवलग मित्र असून, दोघेही गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दीड महिन्यापूर्वीच सक्षम ताटे जामिनावर सुटला होता. माझ्या बहिणीशी का बोलतोस असे म्हणत गुरुवारी हिमेशने सक्षमचा खात्मा केला. या घटनेत आणखी काही आरोपी होते का? याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. या घटनेने नांदेडात अवैध हत्यारांचा मुक्त वावर, वाढती गुंडागर्दीची दहशत कायम असून, पोलिस यंत्रणा त्याचा बीमोड करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
माझ्या बहिणीशी का बोलतोस म्हणत झाडली गोळी, नांदेड हादरले कुख्यात गुन्हेगारांतील वाद विकोपाला, साथीदारांच्या मदतीने केला मित्राचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 23:17 IST