मुंडेंच्या पाठीशी उभे राहताना देशमुख यांच्या बाजूकडे दुर्लक्ष का? मनोज जरांगे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 19:15 IST2025-02-01T19:15:32+5:302025-02-01T19:15:58+5:30
मनोज जरांगे पाटील यांचा महंत नामदेव शास्त्री यांना थेट सवाल

मुंडेंच्या पाठीशी उभे राहताना देशमुख यांच्या बाजूकडे दुर्लक्ष का? मनोज जरांगे यांचा सवाल
छत्रपती संभाजीनगर: भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याबद्दल आपले वैयक्तिक मत असल्याचे पुन्हा नमूद केले आहे. संत, महंतांना वैयक्तिक आयुष्य नसते तर ते सामुदायिक असतात. यामुळे त्यांचे मतही सामुदायिक ठरते. धनंजय मुंडेच्या पाठिशी उभे राहताना मृत देशमुख यांच्या कुटुंबाची दुसऱ्या बाजूचा विचार का झाला नाही, असा सवाल मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी पाच दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे हे ३० जानेवारीपासून छत्रपती संभाजीनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, गुंडांच्या टोळ्या पाळणे, त्यांना खंडणी वसूल करायला लावणे, खून करायला लावणे हे पाप झाकण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावर रात्रभर मुक्कामी गेले होते. दुसऱ्या दिवशी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मुंडे यांनी मागील ५३ दिवसांत खूप सोसल्याचे आणि आपण त्यांच्या पाठिशी असल्याचे पत्रकारांना सांगितले. मुंडे यांच्या हाताला असलेल्या सलाईनच्या इंजेक्शनमधून रक्त दिसल्याचे महंत म्हणाले. परंतु ही एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूचा विचार न करता गुन्हेगाराला साथ देणाऱ्याची पाठराखण महतांने करणे योग्य नसल्याचे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मंत्री धनंजय मुंडे यांनी वाईट पायंडे पाडत खूनशीपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीने संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आपल्याविरोधात गुन्हे नोंदवायला लावले, प्रतिमोर्चे काढले. आता परिसिमा गाठून संप्रदायाला यात ओढल्याची टीका जरांगे पाटील यांनी केली.