छत्रपती संभाजीनगर: लबाड कोण आहे, या प्रश्नाचे उत्तर जनतेने विधानसभा निवडणुकीत दिले आहे. महायुतीच जनतेच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. यामुळे लबाड कोण हा प्रश्नच आता राहिला नसल्याचे नमूद करीत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धवसेनेच्या आजच्या मोर्चाची खिल्ली उडवली. आ. गोऱ्हे म्हणाल्या की, शहराचा पाणी प्रश्न रखडण्यामागे झारीतील शुक्राचार्य कोण, हे सर्वांना माहिती आहे. स्थानिक सर्वेसर्वा असलेल्या नेत्यामुळेच पाणी योजना रखडल्याचा आरोप त्यांनी केला.
गोऱ्हे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आहे. जिल्ह्यातील साडेनऊ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. या योजनेच्या पैशांचा महिला कसा उपयोग करीत आहेत, याबाबतचे सर्वेक्षण आम्ही करणार आहोत. या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर महिलांच्या सबलीकरणासाठी अधिक विचार होईल. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य विभागाचा निधी कमी झाला आहे. त्याविषयी असंतोष व्यक्त होत आहे, यावर गोऱ्हेंना बोलते केले. प्रत्येक योजनेमागे असा एखादा मुद्दा येतो, असे त्या उत्तरल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चांगली योजना पुढे नेणे गरजेचे असते. आजच्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व महिलांची लोह आणि कॅल्शियम तपासणी शिबिर घेण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
खा. संजय राऊत हे मनी लाँड्रिंग आणि पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये राहून आले आहेत. अशा आरोपी व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकावर आपण भाष्य करणार नाही, असे आ. गोऱ्हे म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे मराठवाडा सचिव अशाेक पटवर्धन उपस्थित होते.