दत्तात्रेयांनी संत एकनाथांना दर्शन दिले त्या सुलीभंजन पर्वताचा शोध कोणी लावला? जाणून घ्या
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 14, 2024 18:58 IST2024-12-14T18:57:06+5:302024-12-14T18:58:51+5:30
दत्त जयंती विशेष : श्री दत्तात्रेयांनी संत एकनाथांना दर्शन दिले ते ठिकाण

दत्तात्रेयांनी संत एकनाथांना दर्शन दिले त्या सुलीभंजन पर्वताचा शोध कोणी लावला? जाणून घ्या
छत्रपती संभाजीनगर : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांना खुद्द श्री दत्तप्रभूंनी दर्शन दिले, ती तपोभूमी म्हणजे, खुलताबादजवळील ‘सुलीभंजन’ पर्वत होय. दत्त जयंती व नाथषष्ठीच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र, काळानुसार विस्मरणात गेलेल्या या पर्वताचा शोध कोणी लावला, हे अनेकांना माहीत नाही.
संत काशीविश्वेश्वर बाबांनी दाखविली दिशा
संत वाङ्मयाच्या गाढ्या अभ्यासक व संशोधक डाॅ. कुमुद गोसावी एकनाथ महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करीत होत्या. त्यांना काही प्राचीन ग्रंथात ‘सुलीभंजन’ पर्वताचा उल्लेख आढळला. संत एकनाथ महाराजांचे सदगुरू जनार्दन स्वामी त्यांना तपस्येसाठी तेथे घेऊन जात. कारण तिथे स्वामींचे गुरू म्हणजे प्रत्यक्ष दत्त भगवंतच त्यांना वेगवेगळ्या रूपात येऊन भेटत. शके १४७५ मध्ये श्री दत्तात्रेयांनी एकनाथ महाराजांना मलंग वेशात भेटून अनुग्रह दिला. हा पर्वत नेमका कुठे आहे, याचा शोध डॉ. गोसावी यांनी सुरू केला. १९८३ मध्ये कुमुद गोसावी यांची महान दत्तोपासक काशीविश्वेश्वर बाबा (ज्यांचे आता देवळाई चौकात मंदिर आहे) यांच्याशी भेट झाली. तेव्हा बाबांनी हे स्थान सांगितले.
कुठे आहे सुलीभंजन पर्वत?
देवगिरी किल्ल्याकडून खुलताबादकडे जाताना मध्ये बायपास लागतो. तिथून डावीकडे आत ६ कि.मी. अंतरावर ‘सुलीभंजन’ पर्वत आहे. याचा उल्लेख पद्मपुराण, काशीखंड, श्रीदत्तप्रबोध इ. पवित्र ग्रंथांत आहे.
मूळ नाव ‘शूलभंजन’पर्वत
‘या स्थानाचे महिमान, नाव ठेविले ‘शूलभंजन’, भंजन म्हणिजे भेदून, प्राणी होतील मुक्त’ याचा अर्थ ‘शूलाचं’ म्हणजे प्रापंचिक व्यथा-वेदना यांचं ‘भंजन’ करणारा- त्यांना भेदून जाणारा हा पर्वत--- ‘शूलभंजन पर्वत’ असे आहे. यास ‘सूर्यभंजन’, ‘सुलीभंजन’, ‘सुलभ पर्वत’ असेही म्हटले जाते. या स्थानाबाबत पुस्तकही मी लिहिले.
- डाॅ. कुमुद गोसावी, संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व संशोधक
सुलीभंजन पर्वतावर काय आहे ?
१) सुलीभंजन पर्वतावर मंदिर असून गाभाऱ्यात श्री दत्तात्रेय, सद्गुरू जनार्दन स्वामी व संत एकनाथ महाराज यांच्या मूर्ती आहेत.
२) परिसरात सूर्यकुंड व चंद्रकुंड आहेत.
३) नाथसाधना शिळा आहे (संजीवन शिळा). त्या शिळेवर दगडाने ठोठावले तर सप्तसूर निघतात.