पांढऱ्या डोळ्यांच्या गरुडाची उपचारानंतर पुन्हा गगनभरारी
By साहेबराव हिवराळे | Updated: September 29, 2023 19:37 IST2023-09-29T19:37:23+5:302023-09-29T19:37:38+5:30
जखमी पशू-पक्ष्यांची देखभाल : वन विभागाची कसरत

पांढऱ्या डोळ्यांच्या गरुडाची उपचारानंतर पुन्हा गगनभरारी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) मंजूर झालेले असून, त्यासाठी कोट्यवधींचा निधीही शासनाने सा.बां. विभागाकडे वर्ग केला; परंतु बांधकामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शहर व परिसरात जखमी अवस्थेत सापडलेल्या वन्य जिवांवर उपचार करताना कसरत करावी लागते. पांढऱ्या डोळ्यांचा जखमी गरुड काही दिवसांपूर्वी वन विभागात उपचारासाठी दाखल केला गेला होता. तो नुकताच वन विभागाने मुक्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पांढऱ्या डोळ्यांचा बझार्ड हा एक मध्यम आकाराचा शिकारी पक्षी आहे. त्याची लांबी ३५ ते ४५ सेंमी आणि वजन ३५० ग्रॅम आहे. पंखांचा विस्तार ८५ ते १०० सें.मी. असतो. मादी नरापेक्षा किंचित मोठी असते. तो सडपातळ शरीराचा व गळा पांढरा असतो. शरीर पिवळ्या रंगाचे असून, त्यावर गडद मेशिअल पट्टी असते. अरुंद पंखांच्या टिपा गडद असतात. हा पक्षी कोरड्या मोकळ्या जमिनीत, मोकळ्या जंगलात आणि लागवडीच्या जमिनीवर राहतो. तो लहान पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, बेडूक, खेकडे आणि टोळ यांसारख्या कीटकांची शिकार करतो. या प्रजाती भारत, इराण, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारमध्ये दिसतात. ते ईशान्य अफगाणिस्तानात उन्हाळ्यात जातात. ते हिमालयाच्या पायथ्याशी १,२०० मीटरपर्यंत जाऊ शकतात. अधिवास नष्ट होणे आणि शिकार, लोकसंख्येतील चढ- उतार, हे पक्ष्यांच्या या प्रजातींच्या अस्तित्वासाठी मुख्य धोके आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरने या बझार्ड प्रजातींचे वर्गीकरण आणि मूल्यांकन केले आहे. टीटीसी सेंटर छत्रपती संभाजीनगरात सुरू झाले, तर अशा वन्य जिवांची गैरसोय होणार नाही, असे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे.