"भाजपचे मुंडे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष; पंकजाताईचं शिवसेनेत स्वागतच पण.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 16:02 IST2023-01-16T15:50:02+5:302023-01-16T16:02:35+5:30
मुंडे साहेबांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. पंकजा मुंडे ह्या आमच्याच आहेत, आमच्याकडे राहणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

"भाजपचे मुंडे कुटुंबीयांकडे दुर्लक्ष; पंकजाताईचं शिवसेनेत स्वागतच पण.."
औरंगाबाद - भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा वारंवार पुढे येत असतात. अलीकडेच एका मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी राजकारणातून एक्झिट घेण्याबाबतही विधान केले. त्यानंतर आता ठाकरे गटातील नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना त्यांच्या पक्षात येण्यासाठी ऑफर देत आहेत. पंकजा मुंडे यांचं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालंय असेही शिवसेना नेत चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं होतं. आता, पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंनी पंकजा मुंडेंच्या नाराजीवर बोलताना भाजपवर निशाणा साधला. तसेच, पंकजाताई शिवसेनेत येणार असतील तर स्वागतच आहे, असेही त्यांनी म्हटले.
मुंडे साहेबांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. पंकजा मुंडे ह्या आमच्याच आहेत, आमच्याकडे राहणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले. पण, पंकजाताईंना दूर केलेलंच आहे, ते फडणवीसांनी केलं असेल, रावसाहेब दानवेंनी केलं असेल किंवा आणखी कोणी केलं असेल. पण, आज मुंडे परिवाराला डावलण्याचं काम केलं जातंय, हे दिसत आहे. आमच्या पक्षात येत असतील तर स्वागतच आहे. कारण, उद्धवजींनी त्यांना बहिण मानलेलं आहे. तसेच, तो निर्णय उद्धवजींचा आहे, असेही खैरे यांनी म्हटले.
खैरेंच्या विधानावर फडणवीस म्हणाले
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मातोश्रीचे दार पंकजा मुंडे यांच्यासाठी उघडे असले तरी त्या दारातून कधी जाणार नाही. पंकजाताई भाजपातच राहणार आहे. भाजपा हे त्यांचे घर आहे. त्यामुळे मनातील मांडे मनातच राहतील. कितीही विधानं केली तरी ते राजकीय आहेत. त्याला काही अर्थ नाही असं सांगत त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांना टोला लगावला आहे.