कुठे बनावट औषधी तर नाही ना? औषध प्रशासनाला जाग, सरकारी रुग्णालयांतून घेणार नमुने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:18 IST2024-12-11T12:16:40+5:302024-12-11T12:18:51+5:30

घाटी रुग्णालयाचीही बत्ती पेटली, पुरवठा होणाऱ्या प्रत्येक औषधींची यापुढे तपासणी

Where there is no fake medicine? Wake up the drug administration, take drug samples from government hospitals | कुठे बनावट औषधी तर नाही ना? औषध प्रशासनाला जाग, सरकारी रुग्णालयांतून घेणार नमुने

कुठे बनावट औषधी तर नाही ना? औषध प्रशासनाला जाग, सरकारी रुग्णालयांतून घेणार नमुने

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात बनावट औषधींचा प्रकार सुरू असताना ‘रिॲक्शन आली तर तपासणी, तक्रार आली तर तपासणी’ अशी भूमिका घेणाऱ्या औषध प्रशासनाला अखेर जाग आली आहे. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांतून औषधी नमुने घेऊन बनावट औषधी आहेत की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे.

आजघडीला केवळ दुकानांना परवाने देण्याचेच काम औषधी प्रशासन करीत आहे. औषधी आणि मेडिकल स्टोअर्सच्या तपासणीचे काम नावालाच सुरू आहे. त्यामुळे बनावट औषधी कशा सापडतील, असा सवाल सामान्यांतून उपस्थित होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने १० डिसेंबर रोजी ‘फक्त ५ अधिकारी, बनावट औषधी कशी शोधणार?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत औषधी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतून औषधी नमुने तपासणीसाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बनावट औषधींतील घटकांमुळे आजार बराही होत नसेल आणि औषधींचा काही दुष्परिणामही होत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी कोणाकडून काही तक्रार येण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रत्येक औषधीची तपासणी होणे गरजेचे, आवश्यक असल्याचेही ‘लोकमत’ने समोर आणले. याचीही दखल घेत घाटी प्रशासनाने घेत खबरदारीचे पाऊल टाकले आहे. यापुढे पुरवठा होणाऱ्या औषधींची नमुने तपासण्याचा निर्णय घेतल्याचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

घाटीत महिन्याला दीड कोटींची औषधी
घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह लगतच्या भागातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या ठिकाणी ‘चिठ्ठी’मुक्त उपक्रमांतर्गत रुग्णांना सर्व प्रकारची औषधी मोफत रुग्णालयात उपलब्ध करून दिली जात आहे. महिन्याकाठी दीड कोटींची औषधी लागतात.

१० कोटींची औषधी येणार
घाटी रुग्णालयाला लवकरच १० कोटींची औषधी खरेदी प्रक्रिया होणार आहे. यातील प्रत्येक औषधींच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.

औषध निरीक्षकांना सूचना
जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील औषधींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी औषधी नमुने घेण्यास औषधी निरीक्षकांना सांगण्यात आले आहे. बुधवारपासून नमुने घेण्यास सुरुवात होईल.
- राजगोपाल बजाज, सहआयुक्त, अन्न व औषधी प्रशासन (औषध)

Web Title: Where there is no fake medicine? Wake up the drug administration, take drug samples from government hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.