गावोगाव फिरणारे नेते गेले कुठे ?
By Admin | Updated: November 26, 2014 01:08 IST2014-11-26T00:34:33+5:302014-11-26T01:08:26+5:30
जालना : एक-दीड महिन्यांपूर्वीच्या निवडणुकातून गावोगाव फिरणारे, तोंड फाटेपर्यंत आश्वासन देणारे मोठ-मोठे नेते आता कुठे गेले? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.

गावोगाव फिरणारे नेते गेले कुठे ?
जालना : एक-दीड महिन्यांपूर्वीच्या निवडणुकातून गावोगाव फिरणारे, तोंड फाटेपर्यंत आश्वासन देणारे मोठ-मोठे नेते आता कुठे गेले? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.
जालना तालुक्यातील वखारी या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांबरोबर मंगळवारी हितगुज करतेवेळी ते बोलत होते. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, प्रवक्त्या आ. निलम गोऱ्हे, उपनेते खा. चंद्रकांत खैरे, उपनेते रविंद्र मिर्लेकर, माजी मंत्री तथा आ.अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आ. शिवाजीराव चोथे, डॉ.हिकमतराव उढाण, माजी आ. संतोष सांबरे, जि.प.चे उपाध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाकरे यांनी आपण दुष्काळाचे राजकारण करण्याचा करंटेपणा करणार नाही, असे नमूद करीत विरोधकांवर बोचरी टीका केली. दीड-दोन महिन्यांपूर्वीच्या निवडणुकांमधून गावोगाव देशातले मोठ-मोठे नेते फिरत होते. तोंड फाटेपर्यंत आश्वासनांसह भुलथापा मारत होते. परंतु संकट कोसळले तेव्हा हे मोठ-मोठे नेते फोटोपर्यंत मर्यादीत राहिल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. त्यातील काहींना मराठवाड्यातील दुष्काळही माहित नसेल, असे ते म्हणाले.
गेल्या निवडणुकीत लाट होती. असेलही. पण ती लाट गेली. आता राहिला कोरडेठाकपणा. कोरडेठाकपणा... या लाटेचे पाणी कुठे गेले ? असा सवालही ठाकरे यांनी केला. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. आपणही मुंबईतून स्थितीचा आढावा घेवू शकलो असतो. मात्र तसे न करता प्रत्यक्ष दौरा करण्याचा, सर्वसामान्यांच्या दु:खात सहभागासह सांत्वनाचा, मदतीचा निश्चय केला. परंतु ज्यांना शेतीतले कळते, ते अद्यापपर्यंत आले का? असा सवालही ठाकरे यांनी केला. शेतकरी जगतोय का मरतोय, हे पाहण्याचे भानसुध्दा काहींना राहिले नसल्याची जोरदार टीका केली. शिवसेना आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, असा विश्वास दिला. यावेळी आ. निलम गोऱ्हे, आ. संदीपान भुमरे, आ. संजय सिरसाट, आ. हर्षवर्धन जाधव, आ. दिपक केसरकर, आ. हेमंत पाटील, उपनेते लक्ष्मण वडले, उपजिल्हा प्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, तालुका प्रमुख संतोष मोहिते, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, अंकुश पाचफुले, जि.प. सदस्या सरला वाढेकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)४
येत्या हिवाळी अधिवेशनातून दुष्काळी स्थितीचा सरकारला हेरुन जाब विचारला जाईल. दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडले जाईल, असे नमूद करीत ठाकरे यांनी दुष्काळ तर जाहीर होईलच; पीक कर्ज, वीज बील माफी, शैक्षणिक शुल्क माफीसह प्रति हेक्टरी अनुदान वगैरे धोरणात्मक निर्णय सुध्दा होतीलच, असा विश्वासही व्यक्त केला. आपण या दौऱ्यानंतर राज्यपालांची भेट घेणार असून सरकारला स्पष्ट निर्देश द्यावेत, राज्यपालांनीही दुष्काळी परिस्थतीची पाहणी करावी. मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी करणार आहोत, असे ते म्हणाले.
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाडा दुष्काळ अनुभवतो आहे. यावर्षीही स्थिती गंभीर आहे.शेतकरी पूर्णत: कोलमडला आहे. खचला आहे. परंतू संकटकाळात खचून न जाता, न रडता. याही संकटाचा सामना करतांना त्यावर मात करण्याचा संकल्प सोडला पाहिजे, आत्महत्येचा मार्ग न स्विकारता, मुलाबाळांसह कुटुंबियांचा संसार उद्ध्वस्त न करता, शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सदा-सर्वदा वाईट दिवस नसतात. एखादा दिवस निश्चितच चांगला येईल. तो आनंदाचाच असेल, असा विश्वासही व्यक्त केला.
रखडलेले प्रकल्प मार्गी लावा
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करतेवेळी केवळ प्रथमोपचार न करता सरकारने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अर्धवट अवस्थेत रखडलेले प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. तरच दुष्काळाची तीव्रता कमी होईल, असे मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. वर्षानुवर्षांपासून रखडलेले प्रश्न दुष्काळास कारणीभूत ठरताहेत, असे ते म्हणाले. सरकारने या रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी दिला पाहिजे. मराठवाड्यात अनेक प्रकल्पांचे काम होणे अद्याप बाकी आहे. आपण केलेल्या या दौऱ्यात सर्व ठिकाणी प्रामुख्याने या बाबी दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.