छत्रपती संभाजीनगरात प्रीपेड रिक्षा कधी? प्रवाशांचा प्रवास होईल सुरक्षित अन् किफायतशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:30 IST2025-08-14T19:22:07+5:302025-08-14T19:30:01+5:30
शहरात यापूर्वी रेल्वे स्टेशन येथे प्रीपेड रिक्षा ही योजना राबविण्यात आली होती. परंतु ही योजना नंतर बंद पडली.

छत्रपती संभाजीनगरात प्रीपेड रिक्षा कधी? प्रवाशांचा प्रवास होईल सुरक्षित अन् किफायतशीर
छत्रपती संभाजीनगर : शहरात रिक्षातून प्रवास करताना, विशेषत: रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. त्यातच गेल्या काही दिवसांत काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांमुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी प्रीपेड रिक्षा सुरू करण्याची मागणी रिक्षाचालकांमधून जोर धरत आहे.
शहरात यापूर्वी रेल्वे स्टेशन येथे प्रीपेड रिक्षा ही योजना राबविण्यात आली होती. परंतु ही योजना नंतर बंद पडली. रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकांवर शहराबाहेरून अनेक प्रवासी येत असतात. या प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणी केली जाते. अनेक रिक्षा मीटरवर चालत नाहीत. अशी तक्रार नेहमीच केली जात आहे. प्रवाशांच्या तक्रारी दूर करण्यासाठी रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकावर प्रीपेड रिक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांना लगाम
रिक्षाचालकांची बदनामी रोखण्यासाठी, बाहेरून शहरात येणाऱ्या प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी प्रीपेड रिक्षा सुरू करण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. प्रीपेड रिक्षामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांना लगाम लागून शहराची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. मुंबई, पुण्यात प्रीपेड रिक्षा सुरू आहेत.
- निसार अहेमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक मालक महासंघ
कशी असते प्रीपेड रिक्षा
प्रीपेड रिक्षा योजनेअंतर्गत प्रवासी प्रीपेड सेंटरवर जाऊन प्रवासासाठी रिक्षा बुक करतात. यामुळे प्रवाशांना आपण कोणत्या रिक्षातून प्रवास केला, याची माहिती घेता येते. त्यांच्याजवळील पावतीवर रिक्षा क्रमांकामुळे रिक्षाचा शोध घेणे सोपे होते.