'पुरुष स्वतंत्र कधी होणार ?'; जागतिक पुरुष दिनी पत्नी पीडितांचे शीर्षासन आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:31 PM2021-11-19T17:31:22+5:302021-11-19T17:33:50+5:30

पुरुषांसाठी हेल्प लाईन सुरु करून पुरुष दक्षता समिती स्थापन करावी

'When will men be free?'; Patni Pidit Ashram celebrate World Men's Day by Shirshasana Movement | 'पुरुष स्वतंत्र कधी होणार ?'; जागतिक पुरुष दिनी पत्नी पीडितांचे शीर्षासन आंदोलन 

'पुरुष स्वतंत्र कधी होणार ?'; जागतिक पुरुष दिनी पत्नी पीडितांचे शीर्षासन आंदोलन 

googlenewsNext

औरंगाबाद : पत्नी पिडीत आश्रमात जागतिक पुरुष दिन शीर्षासन आंदोलन करत साजरा करण्यात आला. पुरुषांसाठी सगळे कायदे उलटे आहेत, म्हणून शीर्षासन केल्याचे सांगत आंदोलकांनी यावेळी पुरुषांचे हक्क संरक्षणासाठी विविध मागण्या केल्या. महिला दिन साजरा करण्यात अनेक पुरुषांचाही सहभाग असतो. अनेक शासकीय कार्यालयात महिला दिन साजरा केला जातो. परंतु, पुरुष दिन कुठल्याही शासकीय कार्यालयात साजरा होताना दिसत नाही. हा भेदभाव संपुष्टात आणणे गरजेचे आहे, पुरुषांच्या संरक्षणाचे कायदे करा, पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, कौटुंबिक खटले वर्षभरात निकाली काढावीत आदी मागण्यां यावेळी पत्नी पिडीत पुरुष आश्रमाच्या सदस्यांनी केल्या. 

औरंगाबाद शहराजवळील वाळूज येथे पत्नी पिडीत पुरुष आश्रम आहे. येथे पत्नीपासून छळ होत असलेल्या पुरुषांना कायदेशीर मार्गदर्शन केले जाते. आज आश्रमात जागतिक पुरुष दिन शीर्षासन घालून साजरा करण्यात आला. यावेळी येथील सदस्यांनी स्त्रियांच्या संरक्षणासाठी बनविण्यात आलेल्या कायद्यांमुळे पुरुष अबला होणार नाही याची दखल घेतली नाही. भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटला. परंतु एकतर्फी कायद्यांमुळे पुरुष महिलांच्या गुलामगिरीच्या विळख्यात अडकला असून आता त्यांचे  सबलीकरण करण्याची गरज असल्याचा आरोप केला. बहुतांश पत्नी पीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून व समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहेत. लिंगभेद न करता कायदे बनवल्या गेले पाहिजेत. पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण दिले गेले पाहिजे. स्त्रियां कायद्यांचा गैरवापर करत असल्याने एकत्र कुटुंब पद्धत बुडाली, पत्नीच्या अत्याचाराने युवकांचा विवाहावरचा विश्वास उडाला आहे. पुरुष मेला तरी त्याच्या संपत्तीवर पत्नी दावा ठोकते. खरं तर आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. स्त्रियांच्या ह्या जाचाला पुरुष कंटाळले आहेत. आधी तुरळक घटस्फोट होत असत आता फार तुरळक जोडपी आपला संसार टिकवण्यामध्ये यशस्वी होतात. संसार मोडला याचं दुःख तर असतच त्याहून जास्त आपली मुलंबाळ दूर जातात, त्यांचे भविष्य धोक्यात येते, यासाठी आता पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण देणे गरजेचे आहे, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. 

पुरुष संरक्षण कायदे करा 
दिवसेंदिवस पत्नीपीडित पुरुषांची संख्या वाढत चालली आहे. पत्नी पीडित पुरुष आश्रमात देशभरातून आतापर्यंत 9600 पुरुषांच्या तक्रारी आल्या आहेत. महिन्याला 200 ते 250 पुरुष तक्रारी येतात. खर तर याहून अधिक लोक पत्नी पीडित आहेत. मात्र, समाज काय म्हणेल या भीतीपोटी ते समोर येत नाहीत. यामुळे पुरुषांना कायद्याचे संरक्षण द्यावे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पुरुष दक्षता समिती स्थापन करा, हेल्प लाईन सुरु करावी, कौटुंबिक न्यायलयातील खटले एक वर्षांच्या आत निकाली काढावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे संस्थापक भारत फुलारे, चरणसिंग गुसिंगे, पांडुरंग गांडूळे, सोमनाथ मनाळ ,वैभव घोळवे, सुरेश फुलारे, जगदीश शिंदे, दासोपंत दहिफळे आदी सदस्यांची उपस्थिती होती. 

Web Title: 'When will men be free?'; Patni Pidit Ashram celebrate World Men's Day by Shirshasana Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.