उदंड जाहले सामाजिक कार्य; निवडणुका येताच ‘इच्छुकां’च्या समाजकार्याची धुळवड जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 19:49 IST2020-03-09T19:44:59+5:302020-03-09T19:49:06+5:30
विविध कार्यक्रम आयोजित करायचे आणि रात्री श्रमपरिहार म्हणून कार्यकर्त्यांचा घसा ओला करायचा, असा नित्यनियम सध्या बहुतांश वॉर्डांमध्ये सुरू आहे.

उदंड जाहले सामाजिक कार्य; निवडणुका येताच ‘इच्छुकां’च्या समाजकार्याची धुळवड जोमात
औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवारांच्या समाजकार्याची धुळवड सुरू झाली आहे. प्रत्येक वॉर्डात जनहिताच्या कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. उमेदवारीची अपेक्षा समोर ठेवून चर्चेत राहण्याची ही उठाठेव शहरात सर्वत्र दिसत आहे. मागील पाच वर्षे बिळात लपलेले हवशे-नवशे आता बाहेर पडू लागले आहेत. वॉर्डातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात ज्यांचा कधी सहभाग नाही, त्यांच्यात होर्डिंग्जसह विविध कार्यक्रम घेण्याची स्पर्धा लागली आहे. विविध कार्यक्रम आयोजित करायचे आणि रात्री श्रमपरिहार म्हणून कार्यकर्त्यांचा
घसा ओला करायचा, असा नित्यनियम सध्या बहुतांश वॉर्डांमध्ये सुरू आहे.
समाजकार्याची रेलचेल अशी...
पाण्याचे मोफत टँकर
मागील पाच वर्षांत नागरिकांनी पाण्याचा प्रचंड त्रास सहन केला. अजूनही तो सुरूच आहे. आजवर इच्छुकांना मोफत पाणीपुरवठा करण्याचे सुचले नाही. निवडणुका येताच पिण्याच्या पाण्याचे मोफत टँकर सुरू झाले आहेत.
विविध प्रमाणपत्रांसाठी शिबीर
रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्डसारखे इतर प्रमाणपत्र काढून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन सुरू झाले आहे. बहुतांश वॉर्डांत असे राजकीय मांडव आता दिसून येत आहेत. यामागे उद्देश एकच मतदारांची माहिती संकलित करणे आणि निवडणुकीला सामोरे जाणे.
मोफत आरोग्य शिबीर
मागील पाच वर्षांत वॉर्डांतील कुणी आजारी पडले वा एखादी दुर्दैवी घटना घडली, तर तिकडे ढुंकूनही न पाहणारे इच्छुक आता आरोग्य शिबिरांचे आयोजन करीत आहेत. यामागे एकच हेतू आहे, तो म्हणजे पालिका निवडणुकीत मतदान मिळवणे.
दारूच्या दुकानांसाठी आंदोलने
निवडणुका आल्या की, दारूची दुकाने स्थलांतरित करण्यासाठी आंदोलने सुरू झाली आहेत. मुळात काही दारू विक्रेते, परमिट रूम चालविणाऱ्यांना उमेदवारी हवी आहे. इतर पक्षांतील इच्छुकांनी दारू दुकान स्थलांतर करण्यासाठी आंदोलने सुरू केली आहेत.
अंत्ययात्रेला सगळेच इच्छुक
एरव्ही वॉर्ड व परिसरातील कुणाचा मृत्यू झाला, तर नगरसेवक व इतर कार्यकर्ते, नागरिक दिसून येतात; परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुर्दैवाने वॉर्डात एखादी घटना घडली, तर सगळे इच्छुक अंत्यविधीसाठी सर्वात पुढे असल्याचे दिसत आहेत.
साडीवाटपाचे कार्यक्रम
महिलांसाठी राखीव असलेल्या वॉर्डांमध्ये आता विशिष्ट स्पर्धा घेऊन साडीवाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. मोठमोठ्या मैदानांवर हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत, आजवर कधीही कोणत्या सामाजिक कार्यक्रमात नसणाऱ्यांनी निवडणुका समोर ठेवून असे कार्यक्रम हाती घेतले आहेत.
धार्मिक सहली, व्याख्यान, सप्ताहांना मोठ्या देणग्या
एरव्ही सोशल मीडियातूनच अभिवादन करून मोकळे होणारे इच्छुक आता निवडणुकीमुळे महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानांचे आयोजन करण्यासह धार्मिक सहलींसाठी मतदारांना शिर्डी, त्र्यंबकेश्वर, शेगावकडे पाठवू लागले आहेत. वॉर्डात सप्ताह असतील, तर दणक्यात देणग्या देऊ लागले आहेत.