सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळच का हो?
By Admin | Updated: January 19, 2015 00:56 IST2015-01-19T00:46:18+5:302015-01-19T00:56:55+5:30
आशपाक पठाण , लातूर एकमेकांची टिंगल टवाळी, कोणाची कूरघोडी तर हळूच कोणाची तरी विषय सोडून बडबड. अतिक्रमण.. अतिक्रमण.. अन् अतिक्रमण... एवढाच विषय कानी पडला.

सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळच का हो?
आशपाक पठाण , लातूर
एकमेकांची टिंगल टवाळी, कोणाची कूरघोडी तर हळूच कोणाची तरी विषय सोडून बडबड. अतिक्रमण.. अतिक्रमण.. अन् अतिक्रमण... एवढाच विषय कानी पडला. लहान मुलांप्रमाणे एकमेकांची चेष्टा करीत वाट्टेल ते बोलले जात होते. समोर बसलेले महापौर आणि आयुक्त यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत होत्या. मध्येच कोणी तरी वेगळेपणा दाखविण्यासाठी इकडून तिकडे करीत होते. हा सर्व प्रसंग पाहून एसओएस बालग्रामचे विद्यार्थी आचंबित झाले. मनपाची सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळच असतो का, असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला.
लातूर शहरातील एसओएस बालग्राम ही संघटना अनाथ मुला-मुलींचे संगोपन करते. या संस्थेने शेकडो मुलांचे पुनर्वसन केले आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजाची माहिती व्हावी म्हणून प्रभाग समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी या संस्थेतील मुलांना निमंत्रित केले होते. मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात असलेल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये शहराच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांनी सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव घेतला. सकाळी ११ वाजता एसओएस बालग्रामच्या संचालिका वैष्णवी जोगळेकर या २८ मुलांना घेऊन सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन बसल्या. मुलांना सकाळपासूनच ओढ लागली होती ती सर्वसाधारण सभेच्या कामकाज पाहणीची. घाई घाईत मुलांनी जागा पकडली. सभागृहात कामकाज सुरू होताच अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. कोण काय बोलतो, हेच कळत नव्हते. महापौरांनी परवानगी दिलेल्या सदस्याव्यतिरिक्त इतर सदस्यही जोर जोरात बोलत होते. ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने ३५ महिला नगरसेविका हा सर्व गोंधळ गप्प बसून ऐकत होत्या. सभागृहात फक्त पुरुषांनाच प्रश्न विचारण्याचा व गोंधळ घालण्याचा अधिकार आहे का, अशी कुजबूज विद्यार्थ्यांमध्ये सुरू होती. एकाच विषयावर जोर जोरात सुरू झालेला गोंधळ पाहून महापौर अख्तर शेख यांनी सदस्यांना विनवणी केली. मनपाच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहण्यासाठी व आपला आदर्श घेण्यासाठी विद्यार्थी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले आहेत, अशी माहिती देऊनही सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला. तब्बल दोन तास एकच विषय अन् गोंधळाला कंटाळून अखेर हे विद्यार्थी सभागृह सोडून निघून गेले. सर्वसाधारण सभेचे कामकाज म्हणजे गोंधळच असतो. इथे शिस्त आणि मर्यादा सांभाळल्याच जात नाहीत. सभागृहात विषय सोडून अवांतर विषयावरच कसा वेळ घालवितात, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला़
महापौर व आयुक्तांना खरंच अतिक्रमणाची व्याख्या माहीत नसेल का? वरिष्ठ अधिकारी असे जाणीवपूर्वक तर करीत नसावेत, असा प्रश्न त्या विद्यार्थ्यांना पडला. स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाल्यावर अशीच वागणूक मिळेल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना बोचत होते़
मते मागण्यासाठी दारात येणारे लोकप्रतिनिधी सभागृहात कसे प्रश्न मांडतात, हे पाहण्यासाठी एसओएस बालग्रामचे विद्यार्थी मनपात आले होते. एकाच विषयावर प्रारंभीपासून तेही ठराविक सदस्यांचा गोंधळ पाहून प्रथमच कामकाज पाहणीसाठी आलेले विद्यार्थी हसत होते. लहान मुलांप्रमाणे सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांना भावला नाही. विद्यार्थ्यांना बालग्रामच्या संचालिका वैष्णवी जोगळेकर यांनी सभागृहात येण्यापूर्वीच सकारात्मक दृष्टीने अनुभव घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी हा गोंधळ पाहून आपणही धीट बनले पाहिजे. स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. जेणे करून विषय मांडता यावेत. किरकोळ विषय असला, तरी त्याकडे गांभीर्याने पहायला हवे, असा संदेश घेऊन विद्यार्थी निघून गेले.