कंपनीसाठी भाड्याची इमारत पाहायला गेले अन् आगीत अडकले ! अग्निशामक दलाने वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 19:22 IST2022-02-11T19:21:28+5:302022-02-11T19:22:05+5:30
घाबरलेले कर्मचारी पायऱ्यांपर्यंत आले. खाली मोठी आग लागल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी पटकन गच्चीवर धाव घेतली.

कंपनीसाठी भाड्याची इमारत पाहायला गेले अन् आगीत अडकले ! अग्निशामक दलाने वाचविले
औरंगाबाद : पैठण रोडवरील एक मोठी इमारत खासगी कंपनीने भाडेतत्त्वावर घेण्याचे निश्चित केले. इमारत पाहण्यासाठी कंपनीचे कर्मचारी दुपारी २ वाजता इमारतीत गेले. पहिल्या मजल्यावर इमारत पाहत असताना खालच्या मजल्यावर अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग एवढी भयानक होती की, कर्मचाऱ्यांना खाली येणे अशक्य झाले. घाबरलेले कर्मचारी थेट गच्चीवर गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले. आग विझवून दोन कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
पैठण रोडवर बेस्ट प्राईजच्या बाजूला व्हॅल्यू डी नावाची इमारत आहे. ही इमारत भाडेतत्त्वावर एका कंपनीला हवी होती. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास इमारत पाहणीसाठी आले. तळमजल्यावरील इमारत बघितली. त्यानंतर ते पहिल्या मजल्यावर पोहोचले. इमारत पाहत असताना खालून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. त्यामुळे घाबरलेले कर्मचारी पायऱ्यांपर्यंत आले. खाली मोठी आग लागल्याचे लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी पटकन गच्चीवर धाव घेतली.
या घटनेची माहिती अग्नीशमन विभागाला देण्यात आली. पदमपुरा येथून एक वाहन पाठविण्यात आले. कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करून अवघ्या दहा मिनिटांमध्ये आग आटोक्यात आणली. हे थरारक दृश्य गच्चीवरून कर्मचारी पाहत होते. आग पूर्णपणे विझल्यावर दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ही कारवाई मुख्य अग्नीशमन अधिकारी आर. के. सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन मुंगसे, संजय कुलकर्णी, हरिभाऊ घुगे, संग्राम मोरे, शिवसंभा कल्याणकर, शेख आमेर, शेख तनवीर, शेख समीर, परमेश्वर सालुंके, योगेश दूधे, दीपक वरठे आदींनी केली.