विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा! बाजारात लाल मुळयाची आवक, ग्राहक चकित
By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 9, 2023 13:00 IST2023-12-09T12:59:39+5:302023-12-09T13:00:06+5:30
विशेष म्हणजे, थंडीच्या दिवसांतच हे लाल मुळे बाजारात विक्रीला येत असतात.

विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा! बाजारात लाल मुळयाची आवक, ग्राहक चकित
छत्रपती संभाजीनगर : विकत घ्यायला गेले गाजर, निघाला मुळा... तुम्ही म्हणाल काय, मुळ्यात आणि गाजरात एवढा फरक कळत नाही का...? याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल...! कारण, भाजीमंडईत गाजरासारखा हुबेहूब दिसणारा ‘मुळा’ विक्रीला आला आहे.
हे वाचून तुमची उत्सुकता वाढली असेल... गाजर म्हटले की, लाल, गुलाबी रंग किंवा आता केशरी रंगाचे गाजर आपण बघत असतो. मात्र, मुळा म्हटल्यावर ‘पांढरा’ रंग आपल्या डोळ्यांसमोर येतो. दुसऱ्या रंगातील मुळा आपण कल्पनाच करू शकत नाही; पण आता मुळ्याने आपला रंग बदलला आहे. गाजराच्या आकारातील व त्यासारखाच लाल, गुलाबी रंगाचा मुळा बाजारात आला आहे. गाजर म्हणून ग्राहक भाव विचारायला जातात आणि विक्रेता सांगतो, हे गाजर नव्हे, मुळा आहे; तेव्हा ग्राहकही आर्श्चयचकित होतात. असेच शुक्रवारी औरंगपुरा भाजीमंडईत घडले. पांढऱ्या मुळ्याप्रमाणेच १० रुपयांना एक लाल मुळा विकला जात आहे. ग्राहकही हौशीने तो मुळा खरेदी करत आहेत.
कुठून आला लाल मुळा ?
खुलताबाद तालुक्यातून हा लाल मुळा बाजारात येत आहे. दररोज १ ते २ क्विंटल या लाल मुळ्यांची आवक होत आहे. विशेष म्हणजे, थंडीच्या दिवसांतच हे लाल मुळे बाजारात विक्रीला येत असतात.
एक लिंबू ३०० रुपयांना
एक लिंबू ३०० रुपयांना म्हटलं की, तुमच्या भुवया उंचावल्या असतील, डोळे पांढरे झाले असतील; पण जरा थांबा, हा लिंबू म्हणजे गळलिंबू होय. अर्धा, एक ते दोन किलो आकारांतील या गळलिंबूचे एक नग भाजीमंडईत आकारानुसार २०० ते ३०० रुपयांना विकत आहे. आता तुम्ही म्हणाल, एवढा भाव का... तर मूतखड्याचा आजार ज्यांना आहे, त्यांना गळलिंबूचा रस पाजविला जातो. यामुळे या लिंबाला मागणी असते.