हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:02 IST2021-06-24T04:02:16+5:302021-06-24T04:02:16+5:30

राम शिनगारे औरंगाबाद : हवामान विभागाने मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही भरघोस पावसाचा अंदाज वर्तविला होता. सुरुवातही जोरदार झाली. मात्र ...

The weather department's forecast was wrong again; Donkey danger, will the fox survive? | हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला; गाढवाचा धोका, कोल्हा तारणार का?

राम शिनगारे

औरंगाबाद : हवामान विभागाने मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही भरघोस पावसाचा अंदाज वर्तविला होता. सुरुवातही जोरदार झाली. मात्र आता हवामान खात्याच्या अंदाजाला हुलकावणी देत पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाची पेरणी करण्यासाठी खत, बी-बियाणे खरेदी करून ठेवले आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना दुबार पेरणीची धास्ती पडली आहे. मृग नक्षत्र नुकतेच संपले. मृगाचे वाहन गाढवाने धोका दिला. आता आर्द्रा नक्षत्राचे वाहन कोल्हा तारणार का, असा प्रश्न कास्तकऱ्यांत चर्चीला जात आहे.

भारतीय हवामान विभागाने या वर्षी भरपूर पावसाचा अंदाज वर्तविला होता. ७ जून रोजी येणारा मान्सून त्यापूूर्वीच दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारीही केली आहे. मात्र काही तालुक्यांत अत्यल्प पावसामुळे पेरण्या रखडल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरणीनंतर पाऊसच नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात खरिपाच्या केवळ १६.७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात लागवडीयोग्य क्षेत्र ६ लाख ७५ हजार १७१ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ १ लाख १३ हजार २७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात १ ते २३ जूनदरम्यान मासिक सरासरीच्या ९४.१ मिमी पाऊस झाला आहे. या काळात १२५.२ मिमी पाऊस अपेक्षित होता. २३ दिवसांमध्ये केवळ ११ दिवस पावसाने हजेरी लावल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

पावसाची स्थिती (मि.मी.)

अपेक्षित पाऊस : १२५.२

आतापर्यंत झालेला पाऊस : ९४.१

सर्वांत जास्त पाऊस : ११८.४ मि.मी., औरंगाबाद तालुका

सर्वांत कमी पाऊस : ७७.३ मि.मी., पैठण तालुका

कोठे किती पेरणी (हेक्टरमध्ये)

अपेक्षित पेरणी क्षेत्र : ६,७५,१७१

आतापर्यंत झालेली पेरणी : १,१३,२७०

आकडेवारी

तालुकानिहाय पेरणी व झालेला पाऊस

तालुकानिहाय झालेला पाऊस (मि.मी.) पेरणी (हेक्टरमध्ये)

औरंगाबाद ११८.४ ५९२४

पैठण ७७.३ १३२४

फुलंब्री १०४.३ २०९३७

वैजापूर ८२.१ १८८८३

गंगापूर ८८.७ ४४५३

खुलताबाद ८४.८ ६३४८

सिल्लोड १०४.३ २४५२१

कन्नड ९०.७ २००५५

सोयगाव १००.६ १०८२५

पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)

बाजरी

अपेक्षित पेरणी : ३३३३१

झालेली पेरणी : १७४६

मका

अपेक्षित पेरणी : १,७२,७००

झालेली पेरणी : ३८,२०७

तूर

अपेक्षित पेरणी : ३१,९७२

झालेली पेरणी : ३८४४

उडीद

अपेक्षित पेरणी : ५२०२

झालेली पेरणी : ५६१

मूग

अपेक्षित पेरणी : १२,२१८

झालेली पेरणी : १९४१

कापूस

अपेक्षित पेरणी : ३,९४,२६७

झालेली पेरणी : ६४,१५८

भुईमूग

अपेक्षित पेरणी : ५९०५

झालेली पेरणी : ५१५

सोयाबीन

अपेक्षित पेरणी : १४,६१४

झालेली पेरणी : २१५१

तीळ

अपेक्षित पेरणी : ९१

झालेली पेरणी : ००

प्रतिक्रिया

...तर दुबार पेरणीचे संकट

एक हेक्टरमध्ये सोयाबीन पेरले आहे. ते आता उगवण्यास सुरुवात झाली असून, येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस आला नाही, तर पेरलेले पीक वाया जाईल. दुबार पेरणीशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. आमच्याकडे विहिरीला पाणी आहे, मात्र स्पिंकलरची सुविधा नसल्यामुळे पाणी देता येत नाही. हीच अवस्था परिसरातील शेतकऱ्यांची आहे. पावसाने जास्त दिवस दडी मारल्यास शासनाने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.

- संजय श्रीखंडे, मावसाळा

------------------------------------------

वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही

आमच्या शेतात पूर्ण पेरणी झाली आहे. सोयाबीन, तूर, भाजीपाला आणि आद्रक लावली आहे. आजच शेतात पाहणी केली असता, आणखी पिकाची उगवणही झालेली नाही. पाऊस आला नाही, तर उगवण होण्याची शक्यताही नाही. सगळं पेरलेलं वाया जाईल. आता आपल्या हातात काय राहिलं आहे? पावसाची वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही.

- दत्तू गोरे, खिरडी

-------

Web Title: The weather department's forecast was wrong again; Donkey danger, will the fox survive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.