कन्नड :
नको कुणाची भीक दयेची, चाड धरु कष्टाची, श्रमात दडली दौलत आपल्या भावी सुखस्वप्नांची ॥ मंत्र यशाचा चैतन्याचा, हाच धरु या चित्ती, भविष्य आपुले आपल्या हाती, घडवू नविन क्रांती ॥
या ओळी समान कार्य सत्यात उतरवले आहे चिखलठाणच्या उपक्रमशील शेतकऱ्यांनी. ऐकीचे बळ दाखवत येथील शेतकऱ्यांनी श्रमदानातून एका पुलाची उभारणी केली आहे. याचा फायदा अनेक ग्रामस्थांना होत असून त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चिखलठाणपासून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर वडाळी नावाहून येणारी नदी लागते. याच नदीवर वाघदरा लघुसिंचन तलाव आहे. या नदीवर शेतकऱ्यांनी स्वखर्चाने चार मोठे पाईप टाकून पूल तयार केला होता. परंतु तलाव ओसंडून वाहू लागल्याने आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाच किमीचा फेरा पडत होता.
सध्या संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदीचा प्रवाह कमी झाला नाही. यामुळे पुलावरील रस्ता बंद अवस्थेतच राहिला. याकडे ना प्रशासनाने लक्ष दिले ना कुणी मदतीचा हात दिला. अखेर सर्व शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करून काही रिकाम्या गोण्या विकत आणल्या. त्यानंतर सर्वांनी श्रमदानातून पूल तयार करण्याचा संकल्प केला. रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू भरुन त्या पाईपवर रचल्या. त्यावर मातीमिश्रीत वाळू टाकण्यात आली आणि बघताबघता दोनशे गोण्यातून मजबूत पूल साकार झाला.
या उपक्रमात पोपट चव्हाण, एकनाथ तुरे, दत्तु पाटील चव्हाण, तुकाराम निंबाळकर, राजेंद्र चव्हाण, सोमनाथ जाधव, भगवान चव्हाण, सुनिल चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, विलास दळे आदी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा पंचक्रोशीत होत असून एकीचे बळ दाखवत शेतकऱ्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.