शहरात एलईडी दिवे लावण्याचा मार्ग अखेर मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:16 IST2017-10-04T01:16:36+5:302017-10-04T01:16:36+5:30
शहरात एलईडी दिवे लावण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी ११० कोटी रुपयांचे कंत्राट दिले

शहरात एलईडी दिवे लावण्याचा मार्ग अखेर मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात एलईडी दिवे लावण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी ११० कोटी रुपयांचे कंत्राट दिले. निविदेतील अटी व शर्थीनुसार कंत्राटदाराला संयुक्त बँक खाते उघडून देणे, काम सुरू करण्यासाठी मार्कआऊट देणे आदी कामांना मनपाकडून विलंब करण्यात येत होता. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी एलईडी दिव्यांसंदर्भात बैठक घेतली. बैठकीत त्वरित संयुक्त बँक खाते उघडण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनी या निर्णयाची त्वरित अंमलबजावणीही केली. दरमहिन्याला २ कोटी ४० लाख रुपये कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत.
चार वर्षांपूर्वी मनपाने शहरातील ५० हजार पथदिव्यांना एलईडी दिवे बसविण्यासाठी निविदा मागविली होती. निविदा प्रक्रियेत दोन कंपन्यांमधील वाद औरंगाबाद खंडपीठात पोहोचला. या प्रकरणात न्यायालयाने मनपाच्या बाजूने निर्णय दिला. काम न मिळालेल्या एका कंत्राटदाराने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. २ सप्टेंबर २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयात मनपाचा पराभव झाला. न्यायालयाने कंपनीला वर्क आॅर्डर द्यावी, असे आदेश दिले. एका रात्रीतून मनपाने कंपनीला ई-मेलद्वारे वर्क आॅर्डरही दिली होती. वर्क आॅर्डर मिळाल्यापासून कंपनीचे पदाधिकारी सतत महापालिकेकडे कामासाठी पाठपुरावा करीत होते.
दरम्यान, कंपनीने संपूर्ण पथदिव्यांचे सर्वेक्षण केले. १ लाखाहून अधिक फोटो काढून ठेवले. कोट्यवधी रुपयांचे साहित्यही आणून ठेवले. मनपा प्रशासन कंपनीला काम करण्यास मुभाच देत नव्हती. निविदेच्या अटी, शर्थीनुसार मनपाच्या बँक खात्यासोबत कंत्राटदाराचे खातेही उघडावे. या स्क्रुअल अकाऊंटमध्ये दरमहिन्याला २ कोटी ४० लाख रुपये आपोआप
पडतील.
मंगळवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी पुढाकार घेऊन बैठक घेतली. बैठकीत विविध विघ्ने दूर करण्यात आली. कंपनीतर्फे बनसोडे नाना, शहा उपस्थित होते. यावेळी प्रशासनाला संयुक्त बँक खाते उघडण्याचे आदेश बारवाल यांनी दिले. आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनीही त्वरित बँक खाते उघडण्यास मंजुरी दिली.