ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी

By विजय सरवदे | Published: May 9, 2024 04:24 PM2024-05-09T16:24:23+5:302024-05-09T16:25:54+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ४५९ गावांच्या घशाला कोरड

water supply in rural areas; Water through 646 tankers to the shortage-affected villages of Chhatrapati Sambhajinagar district | ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी

ग्रामीण भागात पाणीबाणी; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना ६४६ टँकरद्वारे पाणी

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी मग्न असून, दुसरीकडे ग्रामीण नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ४५९ गावांना ६४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महिलांना कामधंदे सोडून दिवसभर टँकरच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागत आहे.

दिवसेंदिवस पाणीटंचाईचा चटका तीव्र होत असून, महिनाभरातच १२३ गावे टंचाईच्या विळख्यात आली आहेत. मागच्या महिन्यात २९८ गावे आणि ४८ वाड्यांना ४४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या महिन्यात उष्णतेचा पारा सारखा वरती सरकत असल्याने गाव परिसरातील विहिरी, हातपंप, तलावांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ३९८ गावे, ६१ वाड्या, असे मिळून ४५९ गावे तहानलेली आहेत. त्यावर जि. प. पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना राबविण्यात येत असून, ६४६ टँकरच्या १२३७ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पावसाळ्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे बहुतांश स्रोत आटले आहेत. परिणामी, ऑक्टोबरपासूनच जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. नागरिकांनाच नव्हे, तर जिल्ह्यातील जनावरांनाही पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

सध्या जिल्ह्यातील ९ पैकी फक्त सोयगाव तालुक्यात पाणीटंचाई फारसा परिणाम जाणवत नाही. सध्या तरी या एकाच तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. मात्र, उर्वरित आठही तालुक्यांतील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यामध्ये वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील सर्वाधिक गावे, तर सर्वाधिक कमी खुलताबाद तालुक्यातील गावे तहानलेली आहेत. गंगापूर तालुक्यातील ८६ गावे, पैठण तालुका- ७९, छत्रपती संभाजीनगर तालुका- ८२, वैजापूर तालुका- ८८, फुलंब्री-५१, सिल्लोड- ४५, खुलताबाद- ५ आणि कन्नड तालुक्यातील २३ गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

३४० विहिरींचे अधिग्रहण
जि. प. पाणीपुरवठा विभागाने तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील २७४ गावांतील ३४० विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींतील पाणी शेती किंवा अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास प्रतिबंध घातला आहे.

Web Title: water supply in rural areas; Water through 646 tankers to the shortage-affected villages of Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.