पाणी विक्रीचा धंदा तेजीत !
By Admin | Updated: January 30, 2016 00:30 IST2016-01-30T00:12:49+5:302016-01-30T00:30:42+5:30
हणमंत गायकवाड , लातूर २००१ च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या २ लाख ९९ हजार असून, सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. यातील ६० टक्के स्थानिक रहिवासी आहेत.

पाणी विक्रीचा धंदा तेजीत !
हणमंत गायकवाड , लातूर
२००१ च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या २ लाख ९९ हजार असून, सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. यातील ६० टक्के स्थानिक रहिवासी आहेत. तर ४० टक्के नागरिक शिक्षणानिमित्त तसेच नोकरीनिमित्त निर्वासित वास्तव्यास आहेत. मानवी गरजेनुसार काटकसरीने पाण्याचा वापर केला तर माणसी ३० लिटर्स पाण्याची गरज आहे. ३० लिटर्समधील १५ लिटर आंघोळ, ५ लिटर शौचालय, ४.५ लिटर पिण्यासाठी व अन्य विधीसाठी ५.५ लिटर्स पाणी लागते. परंतु, सध्या मनपाकडून पाणीपुरवठाच बंद झाला आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याशिवाय लातूर शहरातील नागरिकांसमोर पर्याय नाही. सद्य:स्थितीत लातूर शहरात विविध नगरांमध्ये जवळपास सव्वादोनशे वाहनांद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. एका वाहनाच्या किमान दहा ट्रीप होतात. दिवसाला २ हजार पाण्याच्या ट्रीप विकल्या जातात. या वाहनांतून १० लाख लिटर्स पाण्याची विक्री दिवसाला होते. एका वाहनातील टँकर कमीत कमी ५०० रुपयाला विकले जाते. म्हणजे शहरातील नागरिकांना रुपयाला एक लिटर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शहरातील विविध भागांतील नागरिकांनी ही विदारक स्थिती ‘लोकमत’च्या चमूसमोर कथन केली आहे.
नळाला पाणी सुटत नसल्याने लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, ७० टक्के नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवीत आहेत. एकट्या लातूर शहरात जवळपास सव्वादोनशे वाहनांद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय केला जात आहे. शिवाय, जार वॉटरचे ८० व बाटलीबंदच्या ८ अधिकृत प्लँटद्वारे पाणी विक्रीचा व्यवसायही वाढला आहे. पाण्याचे अन्य स्त्रोत नसल्यामुळे विकतच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच लातूर शहरातील नागरिकांकडे नाही. टँकरद्वारे विकत घेतलेल्या पाण्याची किंमत दिवसाला १० लाखांची असून, जार आणि बाटलीबंद पाण्यासाठी लातूरकर दिवसाला २७ लाख मोजताहेत. लातूरकर दिवसाला एकूण ३७ लाख रुपयांचे पाणी विकत घेतात, असे ‘लोकमत’चमूने शुक्रवारी दिवसभर शहरातील नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर ही स्थिती समोर आली आहे.
लातूर शहर व परिसरात जार वॉटरचे ८० प्लँट अधिकृत आहेत. तर बाटलीबंद पाण्याच्या व्यावसायिकांचे ८ प्लँट आहेत. एका जार वॉटर प्लँटची क्षमता दीड ते दोन हजर लिटर्सची आहे. १ लाख ५५ हजार लिटर्स जार वॉटर विकले जाते. तर बाटलीबंद पाणी ८० हजार लिटर्सच्या आसपासची विक्री दररोजची आहे. १ लाख ५५ हजार लिटर्स जार वॉटरची किंमत ४ लाख ८५ हजार होत असून, तर बाटलीबंद ८० हजार लिटर्स पाणी ९ लाख ६० हजार रुपयांना दिवसाला विकत घेतले जाते. जार वॉटर आणि बाटलीबंद पाणी दिवसाला १७ ते १८ लाखांचे होते. म्हणजे टँकरद्वारे घेतलेले पाणी, जार वॉटर व बाटलीबंद पाणी दिवसाला ३६ ते ३७ लाख रुपयांचे पाणी दिवसाला लातूरकर विकत घेत असल्याची वास्तव स्थिती ‘लोकमत’चमूच्या निदर्शनास आली.
लातूर शहरातील प्रभाग क्र. ५ मध्ये ६५ गल्लीबोळ आहेत. यातील गल्लीबोळांमध्ये टँकर जाऊ शकते. अन्य गल्ल्यांमध्ये टँकर जाऊ शकत नाही. येथील नगरसेवक चंद्रकांत चिकटे यांनी प्रत्येक गल्लीत पाणी वाटप समिती स्थापन केली असून, प्रत्येकाच्या घराला २०० लिटर्स पाणी मिळेल, अशी सोय केली आहे. पाणी वाटपासाठी महानगरपालिकेकडून टँकर मंजूर करून घेतले असून, या टँकरच्या दहा फेऱ्या दररोज केल्या जातात. गल्लीतील पाणी वाटप समितीकडे प्रत्येकाला पाणी मिळेल, याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तीन महिला आणि दोन पुरुष या समितीत आहेत. या समितीमार्फत पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी प्रयत्न केले जातात. असाच प्रयोग सुरेश पवार यांच्या प्रभागातही सुरू आहे.