धारूर शहरामध्ये खाजगी टँकरने पाणी
By Admin | Updated: May 19, 2014 01:02 IST2014-05-19T00:34:22+5:302014-05-19T01:02:22+5:30
अनिल महाजन ल्ल धारुर धारुर शहराला पाणीपुरवठा करणारे धनेगाव धरण कोरडे पडल्यामुळे नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
धारूर शहरामध्ये खाजगी टँकरने पाणी
अनिल महाजन ल्ल धारुर धारुर शहराला पाणीपुरवठा करणारे धनेगाव धरण कोरडे पडल्यामुळे नळ योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे शहरवासियांना खाजगी टँकर व शहरातील विंधन विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना धारुरकरांना करावा लागत आहे. सध्या खाजगी टँकरचे भावही या परिस्थितीमुळे वाढले असून, तीन ते चार रुपयांना एक घागर पाणी मिळत आहे. शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. धनेगावचे धरण कोरडे पडल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तांदळवाडी तलावातून आता धारुर शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. या धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा आठ दिवसांत निश्चित सुरू होईल, असा विश्वास नगराध्यक्षा सविता शिनगारे यांनी व्यक्त केला. धारुर-केजसह बारा खेड्यांना पाणीपुरवठा योजना आहे. धनेगावच्या धरणात पाणी नसल्यामुळे ही पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. यामुळे धारुर शहरवासियांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात नगर परिषदेच्या असणार्या विंधन विहिरीवर घागरीच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी न.प. ने १७ ते १८ विहिरी विंधन विहिरी दुरुस्त केल्या. मात्र हे पाणी अपुरे पडू लागल्याने खाजगी टँकरचा आधार धारूर शहरातील नागरिकांना घ्यावा लागत आहे. या टँकरचे भाव पूर्वीपेक्षा दुपटीने वाढविल्याने शहरातील नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सर्वसामान्यांना मात्र दररोज उठले की, डोक्यावर हंडा घेऊन परिसरात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरातील नागरिक पाणीटंचाईने हैराण झालेले दिसून येत आहेत. खाजगी टँकरचे पाणी विकत घेऊनही ते वेळेवर मिळत नसल्यामुळे हाल होत आहेत. त्यामुळे घरी असलेल्या नळाला पाणी केव्हा येणार याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. न.प.ने शहरात १७ ते १८ विंधन विहिरी दुरुस्त केल्यामुळे याचा थोडाफार आधार धारुर शहरातील नागरिकांना होत आहे. एवढे करूनही पाणीटंचाईच्या झळा काही कमी होत असल्याचे नसल्याचे चित्र सध्या धारुर शहरात दिसून येत आहे. धनेगाव धरण कोरडे पडल्याुळे शहरात होणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शहरापासून ४ कि.मी. अंतरावर असणार्या तांदळवाडी तलावातून २७ लक्ष रुपयांची तात्पुरती पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. आठ दिवसांत या योजनेचे पाणी शहरामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. हे पाणी आल्यावर शहरातील पाणीप्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल. ही योजना शहरात आणण्यासाठी या योजनेचे काम वेगाने सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण होईल व धारुर शहराचा पाणीप्रश्न दूर केला जाईल, असा विश्वास नगराध्यक्षा सविता शिनगारे यांनी व्यक्त केला. धनेगाव धरण कोरडे पडल्यामुळे तांदळवाडीच्या तलावातून तात्पुरता पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही नगराध्यक्षांनी सांगितले.