पाणी टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर !
By Admin | Updated: July 6, 2016 23:59 IST2016-07-06T23:29:16+5:302016-07-06T23:59:19+5:30
बीड : पालिका, नगरपंचायतींमार्फत आपल्या घरी येणारे पाणी ज्या टाक्यांतून येते त्यांची सुरक्षा अक्षरश: वाऱ्यावर आहे. टाक्यांमधून घरोघर पाणी सोडले जाते,

पाणी टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर !
बीड : पालिका, नगरपंचायतींमार्फत आपल्या घरी येणारे पाणी ज्या टाक्यांतून येते त्यांची सुरक्षा अक्षरश: वाऱ्यावर आहे. टाक्यांमधून घरोघर पाणी सोडले जाते, त्यामुळे या पाण्याच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते; परंतु जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या ‘रामभरोसे’ आहेत. ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून ही धक्कादायक बाब पुढे आली.
शहरातील २९ हजार नळांना पाणीपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी ११ टोलेजंग टाक्या उभारण्यात आल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्रांबरोबरच पाणी टाक्यांची सुरक्षा आणि स्वच्छता अनिवार्य असताना केवळ चार ठिकाणीच सुरक्षा रक्षक असल्याचे ‘लोकमत’च्या स्टींगमधून समोर आले आहे. टाकीला काटेरी झुडपाच्या सुरक्षा भिंती उभारल्या असून स्वच्छतेअभावी नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. परिणामी साथीच्या रोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता बळावली आहे.
शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. ईट येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध होऊन शहरातील जलशुद्धीकरण केंद्रात साठवले जाते. तेथे मात्र सुरक्षा व्यवस्था दिसून आली.
टाकीच्या तळाला लाखो रुपये खर्चून सुरक्षा रक्षकासाठी कक्ष उभारण्यात आले आहेत. मात्र, ११ पैकी जेमतेम चार टाक्यांना रखवालदार आहेत. उर्वरित ठिकाणी सुरक्षा बेभरोसे आहे. टाकीचे प्रवेशद्वार सताड उघडे असून रक्षकासाठीच्या खोलीला टाळे असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे टाकी ‘ओव्हरफ्लो’ होऊन पाण्याचा अपव्यय होतो तो वेगळाच. टाक्याच्या अंतर्गत भाग स्वच्छ करण्यासाठी केवळ ‘केमिकल्सचा’ वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान टाकीची सुरक्षा आणि स्वच्छता करण अनिवार्य असून देखील याकडे कर्मचाऱ्यांसह नरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
कोठे काय आढळले?
शाहूनगरातील कॅनॉल रोडवरील पाण्याच्या टाकी परिसरात सुरक्षा रक्षकाच्या कक्षाला टाळे होते. दरवाजा खुला असल्याने जनारांचीही वर्दळ होती. टाकीवर चढताना पायऱ्याच्या मध्यभागी कुलूप असल्याने सहजासहजी वर प्रवेश करता येत नव्हता. ठिकठिकाणचे वॉल्व उघडेच असून काटेरी झुडपाने त्यांना विळखा घातला होता. धानोरा रोड, कृषी कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकीला घाणीचा विळखा दिसून आला. सुरक्षारक्षक तर गायब होताच शिवाय व्हाल्वमधून पाणी ठिबकत होते. हे पाणी घेण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होती. आयटीआयच्या पाठीमागे, इदगाह नाका, नगर नाका, खासबाग, नाळवंडी रोड, आदित्यनगरी येथेही पाण्याच्या टाक्या असून, तेथील सुरक्षा व्यवस्थेचाही बोजवारा उडालेला आहे.
नाळवंडी नाक्यावरील पाण्याच्या टाकीजवळ सुरक्षारक्षक आढळून आला. मात्र, भिंतीजवळ काटेरी कुंपण व घाण होती. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.
वडवणी : सांळिबा रोडवर २ लाख ४० हजार लिटर क्षमतेची मोठी टाकी आहे. मामला तलावातून थेट या टाकीमध्येच पाणीसाठा केला जातो. मात्र, या टाकीची सहा महिन्यांपासून साफसफाई झाली नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी सुरक्षाही बेभरोसे होती.
१ हजार नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर मोंढा भागात सर्वात जुने ४० हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ आहे. टाकीचा वरचा काही भाग उघडा असल्याने पाण्यात मोठ्या प्रमाणात घाण जमा होत आहे. (वार्ताहर)
केज : शहरात पाण्याच्या तीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या वतीने बांधलेली ७ लाख ८० हजार लिटर क्षमतेची १ टाकी,९१ हजार लिटर क्षमतेची जुनी १ टाकी आणि २ लाख ७३ हजार लिटर क्षमतेची १ जुनी दगडी टाकी यांचा त्यात समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराला दारे नसल्यामुळे कुत्रे आणि डुकरांचा वावर आढळून आला.
सुरक्षारक्षक नसल्यामुळे अनुचित प्रकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
माजलगाव : पाण्याच्या जुन्या टाकीतून अर्ध्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या टाकीतील पाण्यावर शेवाळे साचलेले आहे. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
या ठिकाणी नगराध्यक्षांचे विश्रामगृह देखील होते. टाकीच्या परिसरात वेगवेगळया प्रकारची झाडे, फुलांची झाडे यामुळे हा परिसर अगदी सुशोभित व सुंदर होता परंतु मागील काही वर्षांपासून टाकीची दुरवस्था झाली आहे. टाकीखाली मोकाट जनावरे, डुकरांचा मुक्त संचार आहे. टाकीजवळ सुरक्षारक्षक नव्हता. टाकीत पाणी सोडण्यासाठी असलेल्या मुख्य पाईप गाळात रूतलेला दिसून आला. (वार्ताहर)