पाण्याचा अंदाज चुकला अन् जीव गेला; मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:20 IST2025-08-08T16:20:10+5:302025-08-08T16:20:10+5:30
नदीत पूर्णा नेवपूर प्रकल्पाच्या पाण्याचा तुंबाव असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे.

पाण्याचा अंदाज चुकला अन् जीव गेला; मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
करंजखेड : मित्रांसोबत पूर्णा नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास करंजखेड येथे घडली. अजय शांताराम खरात असे मयताचे नाव आहे.
करंजखेड येथील अजय शांताराम खरात या तरुणाने बुधवारी दुपारी १ वाजेच्या मजुरीचे काम केले. त्यानंतर तो मित्रांसोबत गावाजवळील पूर्णा नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला. नदीत पूर्णा नेवपूर प्रकल्पाच्या पाण्याचा तुंबाव असल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. पोहताना अजय खोल पाण्यात गेला. याचा त्याला अंदाज न आल्याने तो बुडाला. ही बाब त्याच्या मित्रांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा गेला. त्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. काहींनी पाण्यात उतरून अजयचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही.
त्यामुळे माजी उपसरपंच हर्षवर्धन निकम यांनी डोंगर वस्तीतील ठाकूरवाडी येथील पट्टीचे पोहणारे ग्रामस्थ रघुनाथ मेंगाळ, किसन मेगाळ, नारायण मेगाळ, रामराव मधे, राजू मंधे व दसरथ आवाले यांना बोलावले. त्यांनी येऊन नदीपात्रात अजयचा शोध घेतला. तासाभरानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पिशोर पोलिस ठाण्याचे जमादार लालचंद नागलोद, तलाठी बी. बी. जंगले, ग्रामविकास अधिकारी पंढरीनाथ मैद, पोलिस पाटील दिलीप वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. करंजखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्याने पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत अजयच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.