माजलगाव धरणाची पाणीपातळी तळास

By Admin | Updated: June 22, 2014 00:03 IST2014-06-21T23:19:38+5:302014-06-22T00:03:57+5:30

माजलगाव: येथील धरणातील पाणीपातळी चार टक्क्यांपेक्षा खाली गेली आहे. यामुळे धरणातील पाणी पिण्यासह परळी येथील औद्योगिभ केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Water level of the Majalgaon dam | माजलगाव धरणाची पाणीपातळी तळास

माजलगाव धरणाची पाणीपातळी तळास

माजलगाव: येथील धरणातील पाणीपातळी चार टक्क्यांपेक्षा खाली गेली आहे. यामुळे धरणातील पाणी पिण्यासह परळी येथील औद्योगिभ केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर पश्न निर्माण झाला आहे.
माजलगाव धरणाची पाणी साठवण क्षमता ४३१.८० मीटर येवढी आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने या धरणात केवळ ४२ टक्के पाणीसाठा झाला होता. या धरणातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असते. या धरणामुळे माजलगाव, परळी, धारूर आदी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बागायती शेती केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींनाही धरणामुळे चांगले पाणी असल्याने त्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीसह भाजीपाला, फळबागाही केलेल्या आहेत. यामुळे या धरणातील पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे.
शेतीसह या धरणातील पाण्यामुळे बीड, माजलगावसह परिसरातील अनेक गावांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणातील पाणी आटल्याने आता शेतकऱ्यांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावत आहे.
माजलगाव धरणाच्या उजव्या कालव्यातून एप्रिल व मे महिन्यात दोन पाणीपाळ्या शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आल्या होत्या. या दोन्ही पाणी पाळ्यांसाठी ३२.५३७ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले होते.
पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले. अद्यापही धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही. गत आठवड्यात सिंदफणा नदीला काही प्रमाणात पाणी आले होते. मात्र, यानंतरही धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी टंचाई आराखड्यात या धरणातील १०.७९ टक्के पाणी आरक्षित केले आहे. धरणातील १. ०८ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होऊ शकते, असा अंदाज आहे. धरणात सध्ये ३. ८४ द.ल.घ.मी. पाणी आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्यासह परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित केले आहे, अशी माहिती अभियंता राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.
माजलगाव धरणातील सर्व पाणी आरक्षित केल्याने हे पाणी जोत्याच्या खाली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे एकही पाणी मिळू शकणार नाही.
मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेल्याने व यापुढे धरणातून पाणी मिळणार नसल्यान ज्या शेतकऱ्यांनी धरणाच्या पाण्यावर ऊस, भाजीपाला व फळबागा केल्या आहेत, त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
खडका धरणात सोडले होते पाणी
खडका धरणातून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रास पाणीपुरवठा केला जातो. खडका धरणातील पाणी दोन महिन्यांपूर्वीच आटले होते. यामुळे परळी येथील विद्युत निर्मिती करणारे काही संच बंद ठेवण्याची वेळ आली होती. येथील सर्वच विद्युत निर्मिती बंद पडू नये, यासाठी माजलगाव धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (वार्ताहर)
धरणातील उपसा बंद करणार
उपविभागीय अधिकारी महेंद्र कांबळे म्हणाले की, येत्या काळात पाऊस न झाल्यास पाण्याचे नियोजन आणखी करावे लागेल. जे शेतकरी पाईपलाईन करून धरणातून पाणी उपसा करतात, त्यांचा पाणीउपसाही बंद करणार असल्याचे कांबळे म्हणाले.

Web Title: Water level of the Majalgaon dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.