जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर; सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:29 IST2025-07-14T19:29:29+5:302025-07-14T19:29:52+5:30

१ जूनपासून जायकवाडी धरणात आजपर्यंत ३६ टीएमसी पाणी दाखल झाले आहे.

Water inflow into Jayakwadi dam slows down; stock at 75 percent | जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर; सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटली

जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर; सिंचनाच्या पाण्याची चिंता मिटली

पैठण : नाशिक जिल्ह्यातील पाऊस बंद झाल्याने येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक मंदावली असून रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणातील पाणीसाठा ७५.४२ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.

जायकवाडी धरणात १ जुलैपासून पाण्याची आवक वाढली होती. या दिवशी धरणातील पाणीसाठा ४४.६४ टक्के होता. त्यानंतर सातत्याने नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहिली. त्यामुळे पैठण येथील जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली होती. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाऊस कमी झाल्याचे धरणातील पाण्याची आवक कमी झाली. शनिवारी सायंकाळी धरणात १६ हजार ३७९ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. रविवारी यात आणखी घट झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ९ हजार ४८२ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. आता धरणातील पाणीसाठा ७५.४२ टक्के झाला आहे. धरणाची पाणी पातळी १५१७.१७ फुटावर पोहोचली आहे. धरणात एकूण पाणीसाठा २३७५.५२६ दलघमी झाला असून जिवंत पाणीसाठा १६३७.४२ दलघमीवर पोहोचला आहे. १ जूनपासून जायकवाडी धरणात आजपर्यंत ३६ टीएमसी पाणी दाखल झाले आहे.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देता येणार
जायकवाडी धरणातील पाणीसाठा ७५ टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळे शेतकऱ्यांना आता धरणातून सिंचनासाठी पाणी देता येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची मागणी आल्यास जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडता येणार आहे, तसेच छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसीसह डीएमआयसी तसेच इतर औद्योगिक क्षेत्रासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही पुढील दोन वर्षांसाठी मिटला आहे.

Web Title: Water inflow into Jayakwadi dam slows down; stock at 75 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.