पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले
By Admin | Updated: August 8, 2016 00:40 IST2016-08-08T00:37:17+5:302016-08-08T00:40:43+5:30
उस्मानाबाद : उजनी पाणीपुरवठा योजनेतून दररोज सहा एमएलडी पाणीउपसा केला जात असला तरी शहरवासीयांना मात्र, अद्यापही टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़

पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले
उस्मानाबाद : उजनी पाणीपुरवठा योजनेतून दररोज सहा एमएलडी पाणीउपसा केला जात असला तरी शहरवासीयांना मात्र, अद्यापही टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ पालिकेने आठवड्याला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले असले तरी हे नियोजन कागदावरच राहत असून, अनेक भागात १० ते १२ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे़
सव्वा लाख लोकसंख्येच्या उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तेरणा, रूईभर व सर्वात मोठी उजनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे़ निम्मा पावसाळा लोटत आला तरी तेरणा व रूईभर प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे़ परिणामी शहराची पूर्ण मदार ही उजनी योजनेवर आहे़ मात्र, या योजनेला लागलेले गळतीचे ग्रहण अद्यापही कायम आहे़ एकीकडे पाकिकेकडून दिवसाकाठी जवळपास ६ एमएलडी पाणीउपसा केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी मोठ्या प्रमाणात पाणी हे गळतीतून वाया जात आहे़ शहराला दिवसाकाठी ८ एमएलडी पाण्याची गरज आहे़ दिवसाकाठी पालिकेकडून होणारा पाणीउपसा, गळती होणारे पाणी पाहता किमान चार दिवसाला तरी शहराला पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे़ मात्र, सध्या शहराला ८ ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ विशेषत: हद्दवाढ भागातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन नाही़
पालिकेकडून विविध विभागाला आठवड्याला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे़ असे असले तरी मागील तीन-चार महिन्यांपासून बिघडलेले पाणीपुरवठ्याचे नियोजन अद्यापही सुरळीत झाल्याचे दिसत नाही़
दरम्यान, सध्याचे उपलब्ध पाणी पाहता नगर पालिकेने पुढील आठवड्यापासून शहरातील दोन भागांना दररोज पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे़ त्यादृष्टीने उजनी योजनेच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे़ प्रारंभी अर्धा तास व नंतर दररोज १५ ते २० मिनिटे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगराध्यक्ष डोके यांनी सांगितले़