असा झाला होता थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:25 IST2017-10-04T01:25:15+5:302017-10-04T01:25:15+5:30
खतरनाक सिमी दहशतवादी अब्रार ऊर्फ इस्माईल हा २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत येऊन येथे एका स्थानिक व्यक्तीला भेटणार असल्याची माहिती औरंगाबादच्या अँटी टेररिस्ट स्कॉडचे (एटीएस) पोलीस अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांना खब-याकडून मिळाली होती

असा झाला होता थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खतरनाक सिमी दहशतवादी अब्रार ऊर्फ इस्माईल हा २६ मार्च २०१२ रोजी औरंगाबादेत येऊन येथे एका स्थानिक व्यक्तीला भेटणार असल्याची माहिती औरंगाबादच्या अँटी टेररिस्ट स्कॉडचे (एटीएस) पोलीस अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांना खब-याकडून मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक डॉ. नवीनचंद्र रेड्डी व पथकातील सावंत, ठाकरे, शेख आरेफ आदी १६ पोलीस कर्मचारी व अधिका-यांची विविध पथके करून हिमायतबाग परिसरातील भाई उद्धवराव पाटील विद्यालयाच्या मागे सावित्रीबाई फुलेनगरात सापळा रचून बसविली होती. अब्रार एकटाच येणार अशी टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तयारी केली होती; परंतु अब्रार ऊर्फ इस्माईल या दहशतवाद्यासह शाकेर हुसेन ऊर्फ खलील अखिल खिलजी आणि अजहर कुरेशी हे तिघे अतिरेकी त्या दिवशी आले होते. प्रमुख दहशतवादी अब्रार याची ओळख पटताच पोलीस त्याला पकडण्यास सरसावले. रेड्डी यांनी अब्रारला थांबण्याचे निर्देश दिले; परंतु अब्रारचे साथीदार दहशतवादी अजहर कुरेशी ऊर्फ खलील व शाकेर हुसेन या दोघांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबारास सुरुवात केली. प्रत्युत्तरात पोलीस पथकानेही गोळीबारास सुरुवात केली. भरदुपारी १२.३० वाजेच्या सुमारास चाऊस कॉलनी रोडवरील प्रेरणा किराणा दुकानासमोर एटीएसचे जवान व दहशतवाद्यात जोरदार चकमक उडाली. शाकेर हुसेन ऊर्फ खलील अखिल खिलजी (२०) याच्या पायात गोळ््या लागल्याने तो जमिनीवर कोसळला. तसेच अब्रार ऊर्फ इस्माईल ऊर्फ मुन्ना (२४) यास पोलिसांनी झडप घालून पकडले. त्याच वेळेस अजहर कुरेशी हा प्रेरणा किराणा स्टोअर्सच्या बोळीतून मागे झाडीत पळाला. पळताना त्याच्या दोन्ही हातात असलेल्या पिस्तुलामधून तो पोलिसांच्या दिशेने गोळ््या झाडत होता. तेव्हा पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी झाडलेली गोळी त्याच्या डोक्यात घुसली व तो जागीच ठार झाला. इतर दोघे अतिरेकी जिवंत पकडले गेले होते. हे तिन्ही अतिरेकी इंदोरहून २६ मार्च २०१२ रोजी एका बोलेरो गाडीतून औरंगाबादेतील हिमायतबागेपर्यंत आले होते. या गाडीचा चालक अन्वर हुसेन हा चकमक पाहून पळून गेला होता.