छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा रुग्णालय झोपेत बांधले का? ‘MRI’,‘कॅथलॅब’साठी जागाच नाही!
By संतोष हिरेमठ | Updated: November 17, 2025 17:15 IST2025-11-17T17:11:52+5:302025-11-17T17:15:02+5:30
८ वर्षांपूर्वीच रुग्णसेवेत दाखल रुग्णालयाची अवस्था; रुग्णालयाचा विस्तार आता अशक्य असल्याचे आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा रुग्णालय झोपेत बांधले का? ‘MRI’,‘कॅथलॅब’साठी जागाच नाही!
छत्रपती संभाजीनगर : बुलडाणा जिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन आहे. बीड जिल्हा रुग्णालयात ‘कॅथलॅब’ असून, येथे अँजिओग्राफीलाही सुरुवात झाली आहे. मात्र, अवघ्या ८ वर्षांपूर्वी रुग्णसेवेत दाखल झालेल्या छत्रपती संभाजीनगरातील २०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आता ‘एमआरआय’ आणि ‘कॅथलॅब’साठी जागाच नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालय बांधताना या सुविधेचा विचार का करण्यात आला नाही, रुग्णालयाचे बांधकाम झोपेत केले का, अशी ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ऑक्टोबर २०१७ मध्ये रुग्णसेवेत दाखल झाले. या ठिकाणी सोनोग्राफी, सीटी स्कॅनसह विविध आरोग्य सेवा आहेत. ओपीडीसह विविध विभागांतील उपचारांसाठी एकही रुपयाचेही शुल्क द्यावे लागत नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, राज्यभरातील शासकीय रुग्णालयात सुविधा वाढत होत असताना या रुग्णालयाचा विस्तार आता अशक्य असल्याचे आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘एमआरआय’ मशीन बसविण्यासाठी रुग्णालयात जागेची चाचपणी करण्यात आली; परंतु त्यासाठी पुरेशी जागा नसल्याने ही सुविधा सुरू होणे असल्याचे सांगण्यात आले. ‘कॅथलॅब’ही जागेअभावी शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या दोन सुविधांसाठी गोरगरीब रुग्णांना घाटी रुग्णालयाचाच रस्ता धरावा लागत आहे. परिणामी, घाटी रुग्णालयावर रुग्णांच्या भारवाढीलाच हातभार लागत आहे.
३८ कोटींचा खर्च
जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत ही ३८ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आली. २०१२ मध्ये रुग्णालयाचे काम सुरू झाले होते. या ठिकाणी २०१७ मध्ये रुग्णसेवा सुरू झाली.
२०२२ मध्ये निर्णय; पण..
राज्य शासनाने २०२२ मध्ये आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये कार्डियाक कॅथलॅब उभारणीचा निर्णय घेतला. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये कॅथलॅब करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यात छत्रपती संभाजीनगरचाही समावेश आहे; परंतु आता सुविधेसाठी जागा नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.
महिला रुग्णालयात ‘एमआरआय’ची सुविधा
जिल्हा रुग्णालयात ‘एमआरआय’, ‘कॅथलॅब’ची सुविधा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या सेवा येथे सुरू होणे शक्य नाही. दूध डेअरी येथील महिला रुग्णालयात ‘एमआरआय’ची सुविधा होईल.
- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक