‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये बजावले १४ आरोपींना ‘वॉरंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 18:19 IST2018-10-12T18:14:54+5:302018-10-12T18:19:22+5:30
बुधवारी रात्री केलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले.

‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये बजावले १४ आरोपींना ‘वॉरंट’
औरंगाबाद : सतत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या १४ आरोपींविरुद्ध शहर पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. तर तडीपार आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील २५ गुंडांची झाडाझडती घेतली.
गुन्ह्यात न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाल्यानंतर न्यायालयीन कामकाजसमयी नियमितपणे न्यायालयात हजर राहण्याची जबाबदारी आरोपीची असते. मात्र, अनेक आरोपी असे असतात की, न्यायालयाने अनेकदा समन्स आणि वॉरंट बजावल्यानंतरही ते न्यायालयात येत नाहीत. अशा आरोपींविरोधात न्यायालयाकडून पकड वॉरंट जारी होते. त्यानंतरही ते सतत पोलिसांना चकमा देतात. असे सुमारे १४ आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधातील वॉरंटची अंमलबजावणी पोलिसांना करता येत नव्हती. बुधवारी पोलिसांनी छावणी, एमआयडीसी वाळूज, दौलताबाद आणि वाळूज या चार ठाण्यांतर्गत कोम्बिंग आॅपरेशन राबविले. या आॅपरेशनदरम्यान १४ वाँटेड आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करून गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
यासोबतच पोलिसांच्या रेकॉर्डवरील २५ आरोपी घरीच आहेत का, याबाबतची शहानिशा पोलिसांनी केली. पोलीस उपायुक्त डॉ. निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त डी. एन. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीपाद परोपकारी, ज्ञानेश्वर साबळे, सतीश टाक आणि विवेक सराफ यांच्यासह १५० कर्मचाऱ्यांनी या आॅपरेशनमध्ये सहभाग नोंदविला.