नातवाला बघायचं, एक डोळा तरी द्या...! कोरोनामुळे वाढले दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेले रुग्ण

By संतोष हिरेमठ | Updated: July 21, 2022 15:02 IST2022-07-21T15:01:27+5:302022-07-21T15:02:13+5:30

राज्यात २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प झाल्या. त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसला.

want to see our grandson, give us at least one eye...! Patients with cataracts in both eyes increased due to Corona | नातवाला बघायचं, एक डोळा तरी द्या...! कोरोनामुळे वाढले दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेले रुग्ण

नातवाला बघायचं, एक डोळा तरी द्या...! कोरोनामुळे वाढले दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेले रुग्ण

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद :
‘डाॅक्टरसाहेब, दोन्ही डोळ्यांनी फार काही दिसत नाही. नातवाला बघायचं आहे, एक डोळा तरी चांगला करून द्या...’ अशी आर्त हाक घालत आहे, मोतीबिंदू झालेले वृद्ध. तुम्ही म्हणाल एका डोळ्याने दिसत असेल ना. पण कोरोना प्रादुर्भावात अनेक महिने मोतीबिंदू शस्त्रक्रिया ठप्प होत्या. परिणामी, एका डोळ्याला मोतीबिंदू असलेल्या रुग्णांच्या दुसरा डोळ्यालाही मोतीबिंदू झाला. औरंगाबादसह राज्यभरात अशा रुग्णांची संख्या वाढली असून राज्यात अशा रुग्णांची संख्या लाखावर आहे. त्यामुळे सध्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियांना युद्धपातळीवर प्राधान्यक्रम दिला जात आहे.

राज्यात २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ठप्प झाल्या. त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसला. औरंगाबाद जिल्ह्यात आमखास मैदानासमोरील जिल्हा नेत्र विभाग आणि घाटी रुग्णालय, अशा दोनच शासकीय यंत्रणेत या शस्त्रक्रिया होतात. मोतीबिंदूमुळे अंधत्व आणि दृष्टी क्षीण होणे, हे आव्हानच ठरत आहे. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण सर्वेक्षणाच्या एका अहवालानुसार ५० वर्षांवरील १.९९ टक्के व्यक्तींना अंधत्व येते. कोरोना काळात एका डोळ्याचे उपचार मिळण्यास विलंब झाला. त्यात दुसऱ्या डोळ्यालाही मोतीबिंदू लागण झालेले रुग्ण वाढले. अशा रुग्णांवर उपचाराचे लक्ष्य आता देण्यात आले आहे. यासाठी जूनपासून ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ राबविण्यात येत आहे.

प्राधान्यक्रम देण्याची सूचना
कोरोनाकाळात दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले. अशा रुग्णांना प्राधान्यक्रम देऊन शस्त्रक्रिया करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्हा नेत्रविभाग ४० खाटांचा करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
- डाॅ. सुनीता गोल्हाईत, आरोग्य उपसंचालक

शस्त्रक्रियांचे नियोजन
सर्वेक्षण करून रुग्णांची आकडेवारी गोळा करून मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येत आहे. कोरोनाकाळात आमचे रुग्णालय सुरू होते, पण इतर रुग्णालये बंद होती. त्यामुळे मोतीबिंदूच्या रुग्णांचा अनुशेष वाढला. त्यात एका डोळ्यात मोतीबिंदू असताना आता दुसऱ्या डोळ्याला मोतीबिंदू झाला. अशाप्रकारे दाेन्ही डोळ्यांना मोतीबिंदू असण्याचे प्रमाण वाढले आहे. या रुग्णांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.
- डाॅ. संतोष काळे, जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक

सोयी-सुविधा द्याव्यात
कोरोनाकाळातील अनुशेष भरून काढण्यासाठी नेत्रज्योती अभियान राबविण्यात येत आहे. त्यात दोन्ही डोळ्यांनी अंधत्व असलेल्या रुग्णांना प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. रुग्णसेवा डाॅक्टर देत आहेत. परंतु सोबत सोयी-सुविधाही शासनाने पुरविल्या पाहिजे.
- डाॅ. महेश वैष्णव, अध्यक्ष, शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना

आता रुग्ण लगेच येतात
पूर्वी रुग्ण उशिराने येत असे. आता डोळ्याने थोडेही दिसत नाही तर लगेच रुग्णालयात दाखविले जात आहे. साडेसात हजार रुपयांपासून पुढे लेन्सचा प्रकार, इंजेक्शन, विना इंजेक्शन आदींमुळे वेगवेगळ्या रकमेत खासगी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते.
- डाॅ. वंदना काबरा, कोषाध्यक्ष, जिल्हा नेत्ररोगतज्ज्ञ संघटना

हळूहळू दिसणे झाले कमी
वर्ष, दोन वर्षे झाले. दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला. हळूहळू दिसणे कमी झाले. एक डोळा जास्त पिकल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. आधी एक डोळ्याचे ऑपरेशन होईल, असे सांगितले.
- लीलाबाई घोरपडे, खोडेगाव

जिल्ह्यातील मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांची स्थिती
वर्ष- शस्त्रक्रिया

२०१७-१८-१०,२६७
२०१८-१९-७,७६२
२०१९-२०-६,७१३
२०२०-२१-२,९४१
२०२१-२२-४,४३९

२०२२-२३ ची परिस्थिती (लक्ष्य)
- औरंगाबाद जिल्ह्यात दोन्ही डोळ्यांत मोतीबिंदू- १५, ५५३
- औरंगाबाद जिल्ह्यात एका डोळ्याला मोतीबिंदू-१०,०२०

जिल्हा नेत्र विभागात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा खर्च- १० रुपये ओपीडी शुल्क
खासगी रुग्णालयात : ७,५०० ते एक लाखापर्यंत.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणारी खासगी रुग्णालये-५०
सरकारी- २ (घाटी, जिल्हा नेत्र विभाग)

Web Title: want to see our grandson, give us at least one eye...! Patients with cataracts in both eyes increased due to Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.