आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 19:31 IST2024-12-13T19:29:46+5:302024-12-13T19:31:26+5:30
औद्योगिक परिसरात पंचक्रोशीतून कामगार कामानिमित्त येतात. त्यातच अनेकजण वाळूज ते पंढरपूर असे नियमित अप-डाऊन करतात.

आधीच सिटीबस कमी, त्यात वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाडेवाड दुपटीने; कामगारांच्या खिशाला कात्री
वाळूज महानगर :वाळूज ते पंढरपूर ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक संख्या कामगारांची आहे. स्मार्ट सिटी बसची संख्या कमी असल्याने कामगारांसाठी ऑटोरिक्षा हाच एकमेव व सोईचा पर्याय असून औद्योगिक परिसरात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या बहुतांश कामगारांना ऑटोरिक्षावर अवलंबून रहावे लागते. अचानक गुरुवारी ऑटोरिक्षा चालकांनी वाळूज ते पंढरपूर रिक्षा भाड्यामध्ये दुपटीने वाढ केली. त्याचा थेट परिणाम आर्थिक गणितावर होणार असल्याची खंत कामगारांतून व्यक्त होत आहे.
औद्योगिक परिसरात पंचक्रोशीतून कामगार कामानिमित्त येतात. त्यातच अनेकजण वाळूज ते पंढरपूर असे नियमित अप-डाऊन करतात. वाळूज येथील ऑटोरिक्षात बसणारे बहुतांश कामगार, पंढरपूर येथील कामगार चौक, तिरंगा चौक आणि पंढरपूर बाजारपेठ याठिकाणी उतरून जवळ असणाऱ्या ए, बी, सी आणि डब्लू सेक्टरमधील कंपन्यांमध्ये जातात. त्यामुळे वाळूज ते पंढरपूर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आणि कामगारांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत सुरू असते. त्यातच गुरुवारी सकाळपासून अचानक ऑटोरिक्षात भाडेवाढ करण्यात आल्याने काही काळ कामगार गोंधळात पडले. काहींची चालकांसोबत शाब्दिक चकमक उडाली. तर काहींनी वाढत्या महागाईमुळे ही भाडेवाढ झाल्याचे कळताच भाडेवाढ स्विकारून वाढीव भाडे दिले.
आमच्या खिशाल झळ
कंपनीकडून बसची व्यवस्था फक्त कायम कामगारांसाठी आहे. आमच्यासारख्या कंत्राटी कामगारांना खासगी वाहनातून ये-जा करावी लागते. त्यात रिक्षा आमच्यासाठी सहज आणि स्वस्तात मिळणारे वाहन, पण त्यातही भाडेवाढ झाल्याने पूर्वी साडेपाचशे रुपये लागायचे तिथे आता हजारांच्या वर पैसे लागत असल्याने महिन्याचे आर्थिक गणित बिघडत असल्याबद्दलची नाराजी प्रवासी कामगार बाळू खंदारे, राजेश वाघ, अरुण जाधव, नितीन बनसोडे आदींनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.